एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येणारी नात्यांची वीण सगळं जगणंच समृद्ध करत असते. आजी आणि नात या समृद्ध नात्याचा लेखिकेने केलेला ऊहापोह-

लहानपणी मला कोणी विचारलं की तुला सर्वात जास्त कोण आवडतं, की माझं उत्तर तयार असायचं. माझी आजी- मीराआजी- म्हणजे माझ्या आईची आई. माझ्या जन्माच्या बऱ्याच आधीपासून तिची श्रवणशक्ती कमी होत होत तिला ऐकू येणं संपूर्ण बंद झालं होतं. पण त्यामुळे तिच्या वाणीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. आमच्या हावभावांवरून आणि लिहून दिल्यावर आम्हाला आमचं म्हणणं तिला सांगता येई आणि मग आमचे संवाद रंगत. तिचं हे ऐकू न येणं तिच्या आणि तिच्या मायेच्या माणसांच्या कधीच आड आलं नाही. आम्हा नातवंडांना पाहिल्यावर तिच्या डोळ्यांतली चमक सारं सांगून जायची. तिला भेटल्यावर माझा पहिला हट्ट असायचा की सोलकढी कर. एका पेल्यात गरम पाणी, चार कोकमं, मिरच्यांचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या आणि चवीला मीठ असं जरा भिजत टाकायचं. नारळ नाही नि काही नाही! ती कोमट सोलकढी नेहमीच्या सोलकढीपेक्षा चौपट भारी वाटायची!

तिच्या हाताला उत्तम चव होती. ती मूळची गोव्याची. परुळेकर. तिच्या हातचं शाकाहारी जेवणही छान असायचं, पण माशांमध्ये तिचा हातखंडा होता. मी तिला कधीच तयार मसाले वापरताना पाहिलं नाही. दर वेळी ताजाच मसाला बनवला जायचा. हळकुंड, मिरच्या, धने अशी वाटणाची तयारी असायची. सगळा स्वयंपाक होईपर्यंत पोटात कावळे ओरडत असायचे. पण पहिला घास पोटात गेल्यावर एक वेगळीच मज्जा यायची. तिच्या जेवणाला एक सात्त्विक चव होती. मसाल्यांचा निष्कारण मारा नसायचा. ताजेपणाचा सुगंध असायचा. मला माशांचं वेड लावणारी हीच ती. हे वेड माझ्या आईकडच्या कुटुंबात कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांनाच आहे. माझ्या सगळ्या मावश्या उत्तम मासे करतात. आईकडून ते जरा स्किप झालंय खरं, पण ते थेट माझ्यात उतरलंय. मासे करायचे म्हटलं की माझ्या अंगात विशेष उत्साह येतो. कोळणीकडून ताजे मासे आणायचे, मसाला ताजा वाटायचा आणि गाणी ऐकत छान मूडमध्ये मासे करायचे आणि दुनियेला बोलावून जेवू घालायचं.

तिचं दुसरं वेड होतं, झाडाझुडपांचं. गोव्यात घर लहान-मोठं, गरीब-श्रीमंत कोणाचंही असलं तरी बाजूला चार झाडं हवीतच. त्याशिवाय ते घर वाटत नाही. आजी लग्न करून मुंबईत आली खरी, पण मनाने ती शेवटपर्यंत गोव्यातच होती. बाहेर फेरी मारायला गेली तरी येताना बिया, शेंगा, फांद्या उचलून आणायची. हा तिचा गुण माझ्या आईमध्ये विशेषच उतरलाय. आमच्या बागेत आणि घरातही कुठेही बिया, शेंगा, मुळं फुटण्यासाठी बादल्यांमध्ये विसावलेल्या फांद्या, नवजात रोपं, जरा भराभराच वाढलेली, आधीच्या कुंडीत न मावणारी रोपं असं दिसेल. मीही तिचीच मुलगी आहे. नव्या घरी आल्यावर माझ्या घराला सगळ्यात पहिल्यांदा घरपण दिलं ते माझ्या झाडांनीच.

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

या आणि अशा अनेक गोष्टींमधल्या साधम्र्यातून आजीचं माझ्यातलं अस्तित्व मला जाणवत असतं. तिच्या मनात कधीच न आटणारा प्रेमाचा साठा होता. आईतही आहे. माझ्यातही तो आला आहे, असं मला वाटतं. तिला भांडणं-वाद सहन व्हायचे नाहीत. भावंडा-भावंडांमध्ये कधी वाद झाले तर तिला ते त्यांच्या चेहऱ्यावरून कळायचे. ती कावरीबावरी व्हायची. ऐकू येत नसल्याने त्यांच्या वादाची कारणं तिला कळायची नाहीत. आपल्याला हे थांबवता येत नाही या अगतिकतेने तिचा चेहरा भरून जायचा. ती शांतताप्रिय होती. तिच्या वागण्यात कमालीचा साधेपणा होता. सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम होतं. ती कोणावर विनाकारण चिडचिड, धुसफुस करायची नाही. कोणाबद्दल वाईट बोलताना मी तिला कधीही पाहिलं नाही. अमुक कर, तमुक करू नकोस असे सल्ले देताना पाहिलं नाही. कायम समोरच्याला उपयोगी पडण्याचा तिचा स्वभाव होता.

मी आमच्या आजोबांना पाहिलं नाही. पण ते खूप साधे, सरळ, मृदू स्वभावाचे होते, असं सारे सांगतात. त्या दोघांमधलं प्रेम तिच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचं. त्यांनी तिच्यासाठी घेतलेला पलंग हा तिचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. आई सांगते, आजोबा नोकरी करू लागले होते तरी त्यांनी एसएससीची परीक्षा दिली नव्हती. ती त्यांनी लग्नानंतर दिली. आजी फार शिकलेली नव्हती, पण ती त्यांना मदत करी. दिवसभरात पुस्तकातले धडे वाचून ठेवत असे. आजोबा ऑफिसमधून घरी आले, रात्रीची जेवणं झाली की ती त्यांना धडय़ातली माहिती सांगे. त्यावर त्यांच्या चर्चा होत. एवढय़ा पाठबळावर नोकरी करून, संसार सांभाळून आजोबा एसएससीची परीक्षा पास झाले. नंतर डॉव्हर्सचा कॉमर्स डिप्लोमा करून ‘ट्रेड विंग्ज’मध्ये अकाऊंटंट झाले. प्रथम एका खोलीतला, नंतर दोन खोल्यांतला संसार, पाच मुलं, त्यांची शिक्षणं, लग्नं, सासर-माहेर-गावाकडच्यांचा राबता हे सारं त्या दोघांनी उत्तम निभावलं होतं. परस्पर सामंजस्याशिवाय हे शक्य नाही.

आजोबांच्या निधनानंतर आजी मुलाबाळांच्या संसारात सहज मिसळून गेली, पण तरी तिची अशी स्पेस तिने जपली होती. देव्हाऱ्यात सुंदर रांगोळ्या काढायची. तिचं वाचन चांगलं होतं. रोजच्या वाचनात दासबोध असायचा. जोडीला विवेकानंदाचे खंड, शिवलीलामृत असायचं. रोजचं वर्तमानपत्र हा तर तिला बाकी जगाशी जोडणारा एकमेव दुवा होता. तिचा देवावर विशेषत: श्रीकृष्णावर खूप जीव होता. त्याच्या आयुष्यावर बेतलेली लोकसंगीताच्या बाजाची गाणी ती गायची. त्या चाली, तिचा कापरा आवाज यात एक आर्त भाव होता. तिच्या लाडक्या पलंगावर लोळत तिच्या मांडीत डोकं घुसळत तिची ती गाणी ऐकणं, जुन्या आठवणींनी उजळलेला तिचा चेहरा निरखत राहणं हा माझा आवडता छंद होता.

ती माझा आवाज, माझं गाणं कधीच ऐकू शकली नाही. टी.व्ही.वर मी गाताना ती माझ्याकडे टक लावून पाहायची. नेमकं काय वाटत असेल तेव्हा तिला? माझं कौतुक? की तिला ते ऐकता येत नाही याची खंत? अशा वेळी तिचा चेहरा शांत असायचा. मी तिच्याकडे टक लावून पाहतेय हे कळलं की गोड हसायची. पण तिला माझं कौतुकच वाटत असणार. कारण तिच्या पोथ्या-पुस्तकांमध्ये माझ्या सी.डी.चं कव्हर, माझ्या मुलाखतींची, कार्यक्रमांच्या जाहिरातींची कात्रणं मला सापडायची. आपणच तिचे सर्वात लाडके आहोत, असं आम्हा प्रत्येकाला वाटेल, असं तिचं प्रेम होतं.

ती गेली तो धक्का खूप मोठा होता. तेव्हा पहिल्यांदा पोरकेपण अनुभवलं मी. तिचं जाणं अजूनही झेपलेलं नाहीय मला. ती गेल्याच्या दुसऱ्या दिवशी मी अंगणात तिच्यासाठी सोनचाफ्याचं झाड लावलं. ते झाड आता वाढतंय. बहरतंय. त्याच्या फुलांना तिच्या आठवणींचा सुगंध असेल. मी तिला जेव्हा जेव्हा म्हणायचे, ‘‘आज्जी, मला तुझी खूप आठवण येत होती.’’ तेव्हा ती म्हणायची, ‘‘तुला माझी आठवण येत होती कारण तेव्हा मला तुझी आठवण येत होती.’’ किती साधे, गोड, निरागस क्षण दिलेत तिने मला! आता वाटतं तिच्यासाठी किती गोष्टी करायच्या राहून गेल्या. ती अजून हवी होती. अर्थात जिने आम्हाला इतकं भरभरून दिलं आणि तिच्यासारखं भरभरून द्यायला शिकवलं तिला आम्ही काय देणार? आमची धडपड, लहानसहान यश पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकायचा, तोच अजून पाहता आला असता. आता तिच्यासारख्याच साध्या अशा तिच्या आठवणींची सोबत आहे. त्यात पुन्हा पुन्हा तिला भेटण्याचा आनंद आहे.

आनंदी जोशी – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा