‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘डिअर जिंदगी’ या अवघ्या दोन सिनेमांमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आणि समीक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या दिग्दर्शक गौरी शिंदेच्या वाटचालीवर एक नजर-

आपल्या देशात बॉलिवूडसह प्रादेशिक भाषांमध्ये दर आठवडय़ाला प्रदर्शित होणारे सिनेमे हे सहसा पुरुष दिग्दर्शकांनीच दिग्दर्शित केलेले असतात. कारण मुळात स्री दिग्दर्शकांची संख्याच नगण्य म्हणावी अशीच आहे. म्हणजे दर आठवडय़ाला हिंदूी तसंच इतर भारतीय भाषांमध्ये पुरुषांनी, पुरुषी दृष्टिकोनातून आणि पुरुषांसाठी निर्माण केलेले सिनेमेच पडद्यावर येतात. त्या पुरुषांना कुणीही तुम्ही पुरुषवादी सिनेमे का बनवता असं कुणीही कधीही विचारत नाही. मग मलाच तू स्रीवादी सिनेमे का बनवता, असं का विचारलं जातं?

हा परखड सवाल आहे, अवघे दोनच सिनेमे दिग्दर्शित करून यशस्वी दिग्दर्शकांच्या पंगतीत जाऊन बसलेल्या गौरी शिंदेचा. २०१२ मधला ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि नुकताच आलेला ‘डिअर जिंदगी’ हे गौरीचे दोनच सिनेमे. पण या सिनेमांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली, समीक्षकांची वाहवा मिळवली आणि बॉक्स ऑफिसवरही खणखणीत यश मिळवलं. विचारांचा थेटपणा, ठामपणा, आपल्याला काय म्हणायचं आहे, ते कसं मांडायचं आहे, याची स्पष्ट जाणीव ही गौरीची सगळी वैशिष्टय़ं तिच्या या दोन सिनेमांमधून उठावदारपणे जाणवतात आणि लक्षात येतं की हे पाणी काही वेगळंच आहे.

कारण स्पष्ट आहे. बॉलिवूडचे धंद्याचे रुढ आडाखे ठरलेले असतात. स्टार्सचा समावेश, दोन-चार नाचगाणी, आयटम साँग, मारधाड, व्हिलन असा सगळा मसाला घातला की पैसा वसूल हिंदी सिनेमा तयार होतो. पण इंग्रजी बोलता येत नाही, असा न्यूनगंड असलेली एक मध्यमवयीन स्री या विषयावर सिनेमा काढणं आणि व्यावसायिक पातळीवरही तो यशस्वी करून दाखवणं हे खरोखरच धाडस होतं. विशी बावीशीच्या आजच्या काळातल्या, आजच्या काळाचे पडद्यावर वावरायचे सगळे ‘नियम’ मान्य असलेल्या हिरॉइन्स येत असताना अंगभर साडी नेसलेली, मध्यमवयीन श्रीदेवी पडद्यावर बघायला प्रेक्षक कशाला येईल, असले नेहमीचे ठोकताळे मोडून काढत ‘इंग्लिश विंग्लिश’ने जे यश मिळवलं, त्यात कथा, पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून गौरीचा मोठा वाटा होता.

‘इंग्लिश विंग्लिश’मधली गोष्ट होती शशी गोडबोलेची. ती एक मराठी गृहिणी आहे. तिचा तिच्या हौसेपुरता लाडू बनवण्याचा व्यवसाय आहे. एरवी नवरा, मुलं आणि व्यवसाय हेच तिचं आयुष्य आहे. घरी तिच्या इंग्रजी उच्चारांची चेष्टा होत असते शशीच्या न्यूयॉर्कमध्ये असलेल्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. त्यासाठी मदतीला शशीला आधीपासून बोलावलंय. नवरा आणि मुलं नंतर येणार असं ठरतं. न्यूयॉर्कमध्ये तिला एका कॉफी शॉपमध्ये इंग्लिश बोलता येत नाही म्हणून अवमानकारक वागणूक मिळते. मग ती इंग्रजी शिकायचं ठरवते. गुपचूप चार आठवडय़ांच्या कोर्सला प्रवेश घेते. या क्लासमध्ये तिला वेगवेगळ्या देशांमधून आलेले लोक भेटतात. तिथे इंग्रजी शिकणं, न्यूयॉर्क अनुभवणं हा शशीसाठी तिचं व्यक्तिमत्त्व बदलवणारा अनुभव ठरतो. भाचीच्या लग्नात ती अतिशय सुंदर इंग्रजीत एक छोटंसं भाषण करते. या भाषणात ती सांगते की भारतीय स्त्रीच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता नाही, तर सन्मानाची आहे. इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड ते दुसरं जग बघून आलेल्या स्त्रीचा आत्मविश्वास असा सगळा प्रवास श्रीदेवीने आपल्या अभिनयातून अतिशय समर्थपणे मांडला आहे. पण त्याचबरोबर अतिशय बांधेसूद पटकथा, अर्थपूर्ण संवाद, अर्थपूर्ण दृश्य, कलाकारांची अचूक निवड आणि आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे याचं अचूक भान ही सगळी बलस्थानं या सिनेमात प्रत्येक फ्रेमगणिक दिसत राहतात.

‘इंग्लिश िवग्लिश’नंतर आपण पुन्हा सिनेमा बनवू का, याबाबत गौरी साशंक होती. तिला वाटत होतं की, आपल्याला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. पण टोरोन्टोतल्यां स्क्रीिनगला सिनेमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. डोळ्यात पाणी घेऊन लोक तिला भेटत होते आणि असा सिनेमा केल्याबद्दल पुन्हा पुन्हा तिचे आभार मानत होते. गौरी सांगते, माझ्या सिनेमाचं इतकं कौतुक झालं म्हणून मी असं म्हणत नाहीये, पण तेव्हा खरं तर मला खऱ्या अर्थाने सिनेमाची ताकद समजली. अर्थात या सगळ्यात श्रीदेवीचाही वाटा तितकाच आहे. तिच्यामुळे माझं कामही खूप सोपं झालं. लोकप्रिय अभिनेते मिळवणं, त्यांच्याबरोबर काम करणं कसं अवघड असतं याच्या भीतीदायक कहाण्या मी ऐकल्या आहेत. माझ्या सुदैवाने मला तसा काहीच अनुभव आला नाही. उलट या पहिल्याच सिनेमाच्या अनुभवानंतर आपण आपल्याला हवा तसा सिनेमा बनवू शकतो, असा आत्मविश्वास मला आला.

खरं तर ‘इंग्लिश विंग्लिश’नंतर गौरीला अनेकदा विचारलं गेलं आहे की तिनं शशीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीची इतकी अचूक निवड कशी केली, तिची ऑफर ऐकून श्रीदेवीची प्रतिक्रिया काय होती वगैरे.. गौरीचं स्क्रिप्ट लिहून तयार होत होतं. त्याच दरम्यान तिचा नवरा आर बाल्की बोनी कपूरला भेटायला गेला होता. तिथे बाल्कीने दोन ओळीत गौरीचं लिखाण सुरू असलेल्या सिनेमाची गोष्ट सांगितली. ती ऐकून तिथेच असलेल्या श्रीदेवीने आपल्याला ते सगळं स्क्रिप्ट ऐकायला आवडेल असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी गौरी तिला भेटली आणि स्क्रिप्ट ऐकता ऐकताच श्रीदेवी शशी गोडबोलेच्या इतक्या प्रेमात पडली की ती भूमिका तीच करणार हे तिथंच ठरलं. गौरीसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. कारण आपल्या सिनेमाला अशी श्रीदेवीसारखी स्टार अभिनेत्री मिळेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि मग बाकीच्या गोष्टीही स्वप्नवतच पण प्रत्यक्षात घडल्या. गौरीमध्ये दडलेली एक कुशल दिग्दर्शक पुढे आली.

खरं तर गौरीला सिनेमाची कोणतीही पाश्र्वभूमी नाही की ज्यामुळे या क्षेत्रातला तिचा प्रवेश सोपा व्हावा. पुण्यात एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या गौरीचं सुरुवातीचं आयुष्य तसं चारचौघींसारखंच. पुण्यात सेंट जोसेफ स्कूलमध्ये तिचं शालेय शिक्षण झालं तर तिनं सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. मग इंटर्नशीप करायला ती मुंबईत आली. ‘सुरभि’फेम सिद्धार्थ काक यांच्याकडे तिने इंटर्नशिप केली. मग आयबीडब्ल्यू, बेट्स क्लॅरिऑन, लुई िलटास या जाहिरात एजन्सीबरोबर तिनं काही काळ काम केलं. कॉलेज संपल्यापासूनच तिला सिनेमा निर्मितीचे वेध लागलेले होते. पण सिनेमा सोडाच अ‍ॅड फिल्म करायचाही आत्मविश्वास नव्हता. पण मग तिथून ती गेली ते न्यूयॉर्कला. याच क्षेत्रातलं पुढचं शिक्षण घ्यायला. तिथून परत येताना मात्र ती आत्मविश्वास घेऊन आलेली होती. त्यामुळे तिथून परत आल्यावर ते ‘इंग्लिश विंग्लिश’ बनवेपर्यंतच्या काळात तिने शंभरेक अ‍ॅड फिल्म्स केल्या. अर्थात त्या करत असताना तिला सतत असं वाटायचं की एक ना एक दिवस आपल्याला एक चांगली कल्पना सुचणार आहे आणि आपण त्यावर सिनेमा बनवणार आहोत. याच दरम्यान तिने केलेली ‘ओह मॅन’ ही शॉर्ट फिल्म बíलन महोत्सवासाठी निवडली गेली होती.

गौरी लुई िलटासमध्ये फिल्म डिपार्टमेंटमध्ये काम करत होती तेव्हा आर. बाल्की तिथे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर होता. दोघांची हळूहळू मैत्री झाली, मग प्रेम जमलं. अर्थात सिनेमाची आवड हा त्या दोघांमधला समान दुवा होता. इतका की पहिल्याच डेटला ते गेले ते सिनेमा बघायला. त्यांना दोघांनाही आवडणाऱ्या काजोलचा ‘दुष्मन’ आणि मग ‘झुबेदा’ असे दोन सिनेमे एकाच दिवशी लागोपाठ बघून झाले. गौरी गमतीने सांगते, मला सिनेमाला घेऊन जाणं हा माझं प्रणयाराधन करण्याचा उत्तम मार्ग आहे, हे बहुधा बाल्कीला कळलं होतं.’ त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे २००७ मध्ये बाल्कीचा ‘चीनीकम’ प्रदर्शित व्हायच्या आधी लग्न त्यांनी केलं.

तिने ‘इंग्लिश विंग्लिश’ बनवला तो तिच्या आईला सॉरी म्हणण्यासाठी. अर्थात तिच्या मते हा सगळा सिनेमा काल्पनिक आहे, यातले सगळे प्रसंग प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात घडलेले नाहीत. (सिनेमामध्ये तिच्या जाझ या उच्चाराची मुलं खिल्ली उडवतात. हा प्रसंग आयुष्यात खरोखरच घडलाय, असं गौरी सांगते. तिची आई आज तिला गमतीने असंही म्हणते की बघ, मला इंग्रजी येत नव्हतं म्हणून तू सिनेमा बनवू शकलीस.) पण हा सिनेमा लिहिताना तिच्या डोळ्यांसमोर तिची आईच होती. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रसंगात ती कशी वागली असती हेच तिच्या डोक्यात यायचं. हे एक प्रकारे तिच्या नेणिवेतलं कॅथर्ससि होतं. कारण लहानपणी कुठेतरी तिला आपल्या आईला इंग्रजी येत नाही याचा कमीपणा वाटत होता. अर्थात ही भावना गौरीच्या मनातच असायची आणि ती इतरांना माहीतही नसायची. उत्तम स्वयंपाक बनवणाऱ्या तिच्या आईच्या हातचं जेवायला तिची मित्रमंडळी आवर्जून यायची आणि गौरीला मात्र आईला इंग्रजी येत नाही, अशी कुठेतरी आतल्या आत खंत वाटायची.

गौरी काम करण्यासाठी मुंबईत आली, एकटी राहायला लागली. जगाचे वेगवेगळे अनुभव येत गेले तसे जगातल्या इतर लोकांशी दोन हात करताना आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या आईशी किती असंवेदनशीलतेने वागलो हे जाणवायला लागलं. तिला दुखावल्याची, तिच्याशी चुकीचं वागल्याची जाणीव व्हायला लागली. तिच्यातल्या बंडखोर वृत्तीच्या मुलीने आईला खूप गृहीत धरलं होतं. दुसरीकडे आईचं आपल्यापेक्षा आपल्या भावावर जास्त प्रेम आहे, अशी तिची समजूत होती. त्यातून नकळतपणे तिच्याकडून तिची आई दुखावली गेली होती. या सगळ्या वागण्याबद्दल आईला सॉरी म्हणण्यासाठी आपण इंग्लिश विंग्लिश बनवला असं गौरी सांगते.

इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड हा इंग्लिश विंग्लिशचा विषय म्हणून अधोरेखित केला गेला असला तरी त्याची पंचलाइन सिनेमाच्या शेवटच्या श्रीदेवीच्या टोस्ट स्पीचमध्ये आहे. त्यात ती म्हणते, भारतीय स्त्रीला प्रेमाची कमतरता नाही, ते तिला मिळतं, पण तिला सन्मान हवाय. गौरीच्या मते आपण पुरुषांपेक्षा कमी आहोत असंच स्त्रियांवर पहिल्यापासून िबबवलं जातं. ९० टक्के स्त्रिया तसंच मानत असतात आणि त्यातून हे आलं.
ती सांगते, मला नेहमी विचारलं जातं की सिनेमा बनवताना बाल्कीची मदत होते का? पण हा प्रश्न बाल्कीला कधीच विचारला जात नाही की त्याला माझी मदत होते का? म्हणजे पुरुष जेव्हा काहीतरी वेगळं काम करतो तेव्हा ते स्वतंत्रपणे असेल असं गृहित धरलं जातं आणि स्री एखादं वेगळं काम करते तेव्हा तिला त्यात नवऱ्याने नक्कीच मदत केली असेल असं गृहित धरलं जातं.

आई आपल्यापेक्षा आपल्या भावावर जास्त प्रेम करते या तिच्या लहानपणच्या भावनेचं दृश्य रूप दिसतं ते तिच्या ‘इंग्लिश विंग्लिश’नंतर चार वर्षांनी आलेल्या ‘डिअर जिंदगी’ सिनेमात. ही गोष्ट आहे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या तरुण कायराची. फातिमा, जॅकी आणि गंजू हे तिचे मित्र आहेत. तिचं तिच्या आई-वडिलांशी जमत नाही. तिच्या प्रेमप्रकरणांमध्ये सतत धरसोड सुरू आहे. ती करियरमध्ये यशस्वी आणि वैयक्तिक आयुष्यात अस्वस्थ आहे. त्यातच कायराचा घरमालक ते घर विवाहित जोडप्यांनाच द्यायचा निर्णय घेतो. घर नसल्यामुळे ती गोव्यात आई-वडिलांकडे जाते. तिथे तिला सायकॉलॉजिस्ट डॉ. जहांगीर भेटतो. त्याच्याशी होत असलेल्या संवादातून कायराच्या व्यक्तिमत्त्वात गुंतागुंत का निर्माण झाली आहे ते समजत जातं. लहानपणी तिचे आई-वडील तिला आजी-आजोबांकडे सोडून बिझनेससाठी परदेशात निघून गेलेले असतात. तिच्या पत्रांनाही उत्तर लिहीत नसतात. आपल्यापेक्षा आपल्या भावावर त्यांचं जास्त प्रेम आहे. असं तिला वाटत असतं. या सगळ्यामुळे तिचं भावनिक आयुष्य विस्कळीत झालेलं असतं. जहांगीर म्हणजेच जग तिला सांगतो की यामुळेच ती कोणत्याही रिलेशनशीपमध्ये गेलं की आज ना उद्या ते लोक सोडून जाणार म्हणून आधी स्वत:कडूनच ते नातं संपवून टाकते. तो तिला असंही सांगतो की तिच्याशी असं वागण्याबद्दल तिने आई-वडिलांवर राग असणं साहजिक आहे, पण आता मोठेपणी माणसं चुका करतात हे गृहीत धरून सोडूनही द्यायला हवं. तुझ्या भूतकाळाला तुझ्या वर्तमानावर स्वार होऊन सुंदर भविष्यकाळ विस्कटून टाकायला कारणीभूत होऊ नकोस. कायराला हे पटतं. मग ती पालकांशी जमवून घेते. एक शॉर्ट फिल्म बनवते. कायराने तयार केलेली शॉर्ट फिल्म पाहायला आलेल्या एका देखण्या फíनचर डीलरची तिची मत्री होत असल्याचं सूचित करत सिनेमा संपतो.

म्हटलं तर कुणाच्याही आयुष्यात घडू शकणारी ही साधीसुधी गोष्ट. पण आपल्या सहजसुंदर, लोभस वावराने अवघ्या तेविशीतल्या आलिया भटने डिअर जिंदगीची प्रत्येक फ्रेम जिवंत केली आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’च्या नितांतसुंदर अनुभवामुळे गौरीचा सिनेमा येणार म्हटल्यावर प्रेक्षक त्याची आधीपासून वाट बघायला लागले आणि ३३ कोटींत बनवलेल्या या सिनेमाने १३८ कोटींचा व्यवसाय केला. तुमच्या लहान मुलांच्या आयुष्यातली एक साधीशी गोष्ट त्यांच्या जीवनावर कसा परिणाम करू शकते, हे फ्लॅशबॅक पद्धतीने सांगणाऱ्या या सिनेमाकडे प्रेक्षक खेचला जायला अर्थातच सगळ्यात मोठं आकर्षण होतं, शाहरुख खान. शाहरुखला बघायला प्रेक्षक गेले आणि आलियाच्या प्रेमात पडून आले असंही या सिनेमाच्या बाबतीत घडलं.

आधी श्रीदेवी, आता शाहरुख आणि आलिया अशा स्टार लोकांबरोबर काम करताना कसं वाटलं असा प्रश्न अर्थातच गौरीला ती फक्त दोन सिनेमे केलेली दिग्दर्शक असल्यामुळे विचारला गेला. पण गौरी सांगते की दोन्ही सिनेमे लिहिताना तिने कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री डोक्यात ठेवला नव्हता. पण मला एवढंच समजलं आहे की मी अशाच लोकांबरोबर काम करू शकते ज्यांच्याशी माझी नाळ जुळते. आणि आपली नाळ जुळणार आहे की नाही हे शूटिंग सुरू व्हायच्या खूप आधीच समजतं.

‘डिअर जिंदगी’त आलियासोबत शाहरुख खान काम करणार होता. आलियाच्या वयापेक्षा जास्त त्याचा कामाचा अनुभव आहे. शाहरुख खान या नावाचा नकळत ताण दोघींवर होताच. प्रत्यक्ष शूटिंग सुरू झालं. सेटवर रोज काम सुरू झालं तेव्हा तिला जाणवलं की शाहरुख खानला जे वलय आहे त्यापलीकडे त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे, की ज्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं एकदम सोपं होऊन गेलं. ती सांगते, तो माझ्या आणि आलियाच्या पाच पट अनुभवी आहे. पण तो कधीच मला सगळं माहीत आहे, अशा पद्धतीने वावरत नाही. त्यामुळे शाहरुख या नावाचं जे दडपण येऊ शकतं त्यातून आम्ही पटकन बाहेर आलो आणि त्याच्याबरोबर काम करायला सरावलो.

आधी इंग्रजी न येणाऱ्या मध्यमवयीन स्त्रीची गोष्ट आणि नंतर तरुण सिनेमॅटोग्राफर अशा कायराची गोष्ट. गौरीला त्यामुळे सतत विचारला गेलेला प्रश्न म्हणजे तू स्त्रीप्रधान सिनेमेच का करतेस? ती स्वत:ला स्त्रीवादी मानत नाही, पण यावरचं तिचं उत्तर मात्र स्त्रीवादीच आहे. गेली अनेक वर्षे सगळे पुरुष दिग्दर्शक त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे पुरुषवादी सिनेमे बनवत आहेत. त्यांना कुणी हा प्रश्न का विचारत नाही की तुम्ही असे सिनेमे का बनवता, असा तिचा परखड सवाल असतो. अर्थात पुढे जाऊन ती हेही सांगते की डिअर जिंदगीतला कायराची गोष्ट ही एखाद्या मुलाचीही असू शकली असती. पण ती म्हणते मी स्त्री असल्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे स्रियांच्याच दृष्टिकोनातून बघू शकते. तशाही स्त्रीच्या दृष्टिकोनातून बॉलीवूडमध्ये अशा किती गोष्टी सांगितल्या जातात?

तिच्या दोन सिनेमांमुळे तिला स्त्रीवादी समजून स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी तिला आमंत्रणं यायला लागली. पण त्याबाबत तिचे विचार थेट आणि स्पष्ट आहेत. ती म्हणते, म्हणते मी फक्त सिनेकर्मी आहे. मला फक्त सिनेमाच्या माध्यमातून माझं म्हणणं मांडायचं आहे. कोणत्याही प्रश्नाचा झेंडा हातात घेऊन उभं राहणं हे मी करू शकत नाही.

बाल्कीने काढलेला ‘की अ‍ॅण्ड का’ हा सिनेमा पुरुषाने घरकाम करणं या थीमवर होता. त्याबाबत ती गमतीने बाल्कीला असंही सांगते की तू ज्या व्यक्तरेखा पडद्यावर मांडतोस, तसं तू प्रत्यक्ष वागायला हवं. म्हणजे ‘की अ‍ॅण्ड का’मध्ये अर्जुनच्या व्यक्तिरेखेत त्यानं जे दाखवलंय ते त्यानंही घरी करायला हवं. बायकोची काळजी घेणं, तिच्यासाठी स्वयंपाक बनवणं हे फक्त पडद्यावरच दाखवून काय उपयोग? ते वास्तवातही असायला हवं.
तिचा नवरा, आर बाल्की म्हणजे ‘चिनीकम’, ‘पा’, ‘की अ‍ॅण्ड का’सारख्या सिनेमांचा दिग्दर्शक. गौरी सांगते, पुरुष म्हणून बाल्की खूप उदारमतवादी आहे. त्यामुळे आमच्यात स्त्री-पुरुषांमध्ये असतात तसे इगो इश्यूज कधीच नसतात. पण असू शकते. आमच्या दोघांत तुलना करायची तर माझ्याकडे जास्त चांगली दिग्दर्शकीय कौशल्य आहेत तर त्याच्याकडे लिखाणाची. त्याच्याइतकं चांगलं लिखाण करायला मला कधीच जमणार नाही. बाल्की वयाने मोठा, प्रस्थापित झालेला आणि जास्त अनुभवी आहे. त्यामुळे त्याच्या प्रभावातून बाहेर येणं आणि एक व्यक्ती म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणं हे माझ्यासाठी खूप अवघड, आव्हानाचं आहे.

आजच्या काळात लग्नव्यवस्था कालबाह्य़ झाली आहे, मला आयुष्यात इतक्या गोष्टी करायच्या आहेत की मुलं जन्माला घालून त्यांना वाढवण्यासाठी वेळ कुठून आणू, तेव्हा हे टास्क पुढच्या जन्मासाठी असं म्हणणारी गौरी शिंदे फक्त दोन सिनेमांमुळे आजची आघाडीची दिग्दर्शक ठरली आहे. सिनेमासृष्टीत अभिनेत्रींची संख्य भरपूर असली तरी दिग्दर्शक, इतर तंत्रज्ञ या कामांसाठी स्रिया अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आढळतात. अशा वेळी गौरी जरी ‘मी कोणत्याही प्रश्नांचा झेंडा हातात घेऊन उभी राहू शकत नाही’ असं म्हणत असली तरी पुरुषांच्या जगात उभं राहून स्वत:ला हवे तसेच सिनेमे काढणं हे तिचं स्त्रियांचे विषय ठळकपणे मोठय़ा कॅनव्हासवर आणण्याचं काम तिला एक समर्थ स्त्रीवादी दिग्दर्शक अशी ओळख मिळवून देणारंच आहे, यात शंका नाही.

(संदर्भ- विविध नियतकालिकांमधील मुलाखती)
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा