सौरभ नाईक

गांधीजींना महात्मा वाटणाऱ्या श्रीमद राजचंद्र यांचा जीवनप्रवास आणि गांधीजींचा मोहनदास गांधी ते महात्मा गांधी असा प्रवास दर्शवणारी ‘युगपुरुष’ ही नाटय़कृती म्हणजे एक माहितीप्रधान कलाकृती आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात एक नाव देशवासीयांच्याच नव्हे तर जगाच्या मन:पटलावर कोरले गेले होते, ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी, अर्थातच ‘महात्मा गांधी’. गांधींना सकल जग ‘महात्मा’ म्हणतं, पण त्यांचे आध्यात्मिक गुरू, सांसारिक जीवनातील गहन प्रश्न सोडवणारे आणि गांधीजींना ‘महात्मा’ वाटणारे असे एक गुरू होते ते म्हणजे श्रीमद राजचंद्र. याच व्यक्तीच्या जीवनप्रवासावर आधारित आणि गांधीजींचा मोहनदास गांधी ते महात्मा गांधी असा प्रवास दर्शवणारी एक नाटय़कृती मराठी रंगभूमीवर साकार होतेय, ती म्हणजे ‘श्रीमद राजचंद्र मिशन, धर्मपूर’ निर्मित ‘युगपुरुष- महात्म्यांचे महात्मा.’

‘युगपुरुष’ या नाटकाकडे एक कलाकृती म्हणून पाहताना जाणवतं की हे नाटक स्वत:च आपण कलाकृती सादर करतोय हे विसरतं आणि फक्त एक विशिष्ट धर्माचा अथवा पंथाचा उदोउदो करताना आढळून येतं. जेव्हा एखादी नाटय़कृती सादर होत असते तेव्हा नाटकाच्या अंगांने तिचा विचार होणे भाग आहे. पण संहितेत एकदा चूक झाली की मग नाटकाला कुणीच वाचवू शकत नाही. या नाटकाचंसुद्धा असंच काहीसं झालेलं दिसतं. नाटक संहितेत अडकतं आणि ती कलाकृती व्यक्तिकेंद्रित होत जाते. स्पष्टच सांगायचं तर संपूर्ण कलाकृती ही ‘राजचंद्र एके राजचंद्र’ झाली आहे. त्यांचा मोठेपणा, त्यांचं महात्म्य वर्णन करण्यातच नाटक धन्यता मानतं. कदाचित निर्मात्यांचा हेतू काहीसा वेगळा असावा अशी शंकासुद्धा एका विशिष्ट वेळेनंतर आणि वाक्यांनंतर येते. नाटकात काही विधाने विरोधाभास दर्शवितात. नाटक शिकवण देत असेल तर त्यातील प्रसंगांमध्येसुद्धा शिकवणीचे पडसाद उमटले पाहिजे. एकीकडे श्रीमद रामचंद्र आणि महात्मा गांधी यांच्या प्रसंगात देव देवळात नसतो अशी शिकवण दिली जात असते, तर त्याच नाटकात एका वेगळया प्रसंगात गांधीजींना ‘आज प्रार्थनेला देवळात जाऊ नका, तुम्हाला धोका आहे’ असं सांगितल्यावर मला धोका असला तरी देवाला विसरून कसं चालेल, त्यामुळे देवाला भेटायला देवळात जावंच लागेल, अशा अर्थाची वाक्ये येतात. हा केवढा मोठा विरोधाभास आहे! एकूणच संहिता आणि लिखाण यात नाटक मागे पडलंय.

नाटकाची जमेची बाजू एकच.. तरुणपणीचे गांधी साकारणाऱ्या श्रेयस राजे यांनी उत्तम अभिनय केला असून, एक वेगळा, न पाहिलेला गांधी त्यांनी लोकांसमोर उभा केला. नाटकाची प्रकाशयोजना छान साकारली गेली असली तरी ती हाताळण्यात बऱ्याचदा चूक होते. तसंच नेपथ्याचंही. नाटकाचं नेपथ्य भव्यदिव्य आणि नेत्रदीपक आहे. पण रंगमंच व्यवस्था नीट न सांभाळता आल्याने त्याला मध्येच गालबोट लागल्यासारखं वाटतं. नाटकाचं दिग्दर्शन पूरक आहे. त्याहून फार काही वेगळं करता येईल अशी व्यवस्था त्या नाटकाच्या संहितेने ठेवलीच नाहीय. संगीत मात्र दाद देण्यासारखं झालंय. काही प्रसंग संगीतामुळेच अक्षरश: अंगावर येतात.

एकूणच ही नाटय़कलाकृती म्हणून पाहता फारशी साजेशी झाली नसली तरी नाटक बरंच माहितीप्रधान आहे. आपल्याला आजवर माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी त्यातून कळू शकतात.

सौरभ नाईक – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा