सौरभ नाईक
‘जॉय कलामंच’निर्मित ‘क्वीन मेकर’ हे नाटक कॉर्पोरेट विश्वाचं दर्शन घडवणारं आणि यशस्वीतेच्या कल्पनांना पायदळी तुडवणारं एक डोळस नाटक. हे नाटक तुम्हाला अनुभवायला देतं एका व्यक्तिमत्त्वाचा अधोगतीकडे होणारा प्रवास. पूर्ण जिंकूनही प्रेक्षकांच्या नजरेत मात्र अपयशी ठरलेला माणूस. यश, सुख, संपत्ती पायाशी लोळण घेत असताना आणि सतत प्रगतीकडे जात असतानासुद्धा मानसिक अधोगतीकडे जाणारा. या नाटकाचा नायक म्हणजे आंतरिक मायाजालाचा कळस आणि बौद्धिक उतरंडीची किळस. आणि या नाटकाच्या नायिका म्हणजे कॉर्पोरेट विश्वाच्या जाळ्यात अडक लेल्या, अतृप्त पण तितक्याच आत्मभिमानी स्त्रिया.
या नाटकाचं कथानक वरवर दिसायला फार सोपं आणि नवं वाटत असलं तरी त्या पुरुषी वृत्तीमागची मत्तता वर्षांनुवष्रे विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली. कॉर्पोरेट विश्वातल्या तमाम पुरुषप्रधान प्रवृत्तीचा उपासक आणि उपभोक्ता म्हणजे या नाटकाचा नायक मीर देशपांडे. आणि त्याने निर्माण केलेली एक क्वीन म्हणजे नेहा. एका भावनिक आणि शारीरिक वळणावर ती त्याची प्रत्यक्ष आयुष्यात राणी होते. उत्साहाच्या भरात ती त्याच्या सगळ्या अटी मान्य करते, पण तिला अचानक ‘मातृत्वाची’ अनामिक ओढ लागते. ती आई होणार असते हे त्याला पसंत नसतं आणि ते त्या अटींमध्येच असतं. अट तर मान्य केलेली असते. आता? दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम असतात. अशा वेळेस त्याच्या आयुष्यात अजून एक क्वीन येते आणि तिच्याही आयुष्यात एक क्वीन येते. आता ती क्वीन कोण, त्यांचं पुढे काय होतं यासाठी हे नाटक पाहणं गरजेचं आहे.
नाटकात मीरचं पात्र साकारणाऱ्या अक्षर कोठारीने भूमिका उत्तम केली असून विशेषत: शेवटच्या काही आजारपणाच्या प्रसंगात त्याचा अभिनय खुलतो. अभिनयाचा बाज उत्तम जमला असला तरी अक्षरने पाठांतराकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. एक-दोन प्रसंगांत संवाद ‘ओव्हरलॅप’ झाले, मध्येच एकदा संवाद विसरल्याची किंचितशी जाणीव झाली, यातून प्रेक्षकांचा रसभंग होतो. नेहाचं पात्र साकारणाऱ्या शीतल क्षीरसागर यांनी उत्तम अभिनय केला आहे. बंद दरवाजाआड चाललेलं संभाषण ऐकताना त्यांनी चेहऱ्यावर जे बारकावे दाखवले आहेत ते अवर्णनीय आहेत. अंकिता पनवेलकर आणि अमित गुहे यांनीसुद्धा प्रसंगाप्रमाणे अभिनयाने सहकाऱ्यांस उत्तम साथ दिलीये. विशेष कौतुक परीचे पात्र साकारणाऱ्या ‘इलिना शेंडे’ या बालकलाकार मुलीचे. या छोटय़ा मुलीने जो काही अभिनय केलाय त्याला तोड नाही.
रवी भगवते यांची कथा हा नाटकाचा मूळ आधारस्तंभ. त्यांनी यातला नायक छान रंगवलाय. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य नेहमीप्रमाणेच अप्रतिम! प्रेक्षक त्या बंगल्यात बसूनच नाटय़ पाहतायत असं वाटतं. प्रकाशयोजनेला योग्य ठिकाणी अजून वाव होता. काही प्रसंगांना प्रकाशयोजना आल्हाददायक वाटते. तर काही प्रसंगांत अनावश्यक वाटून अंगावर येते. फोनची िरग वाजताना आणि त्या भागात कुणीही माणूस नसताना एका विशिष्ट कलरचा भडक रंगाचा लाइट िरगप्रमाणे का चालू बंद करावा हे न उलगडलेलं कोडं आहे. नाटकाचं संगीत मात्र उत्तम झालंय. नाटकातील जुळून आलेली सगळ्यात उत्तम कुठली गोष्ट असेल तर ती ही. नाटकाचं संगीत प्रसंग जिवंत करतं. परीक्षित भातखंडे यांनी केलेली संगीताची कमाल लाजवाब आहे. दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी दिग्दर्शनात फारशी कसर सोडलेली नाही. मध्येच फक्त कधीतरी नाटकाचा प्रसंगावरील ताबा सुटतो आणि अशाने नाटकाचा प्रेक्षकांवरीलही ताबा सुटण्याची दाट शक्यता असते. पहिला अंक उगाचच ताणल्यासारखा वाटतो. दुसरा अंक उत्तम झालाय. त्यात नाटकाचं सार अचानक एकदम एकवटून आल्यासारखं वाटतं. त्याचा समतोल संपूर्ण प्रयोगभर राखून ठेवणं अत्यावश्यक आहे.
आजवर आपण ऐकलं होतं की ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.’ या नाटकातून आपण ‘यशस्वी स्त्रीमागे पुरुष कसा असू शकतो?’ आणि जर तो पाठीशी असला तर एक सामान्य स्त्री ‘क्वीन’ कशी होऊ शकते, याचा परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला या नाटकातून दिसून येईल.
सौरभ नाईक – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा