अजय देवगणनिर्मित आणि सतीश राजवाडेदिग्दर्शित ‘आपला मानूस’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका हे या कौटुंबिक, रहस्यमय थरार (सस्पेन्स थ्रिलर) चित्रपटाचे खास वैशिष्टय़ आहे. सुमित राघवन, इरावती हर्षे यांच्याही व्यक्तिरेखा चित्रपटात महत्त्वाच्या आहेत. विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ नाटकावर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती ‘वायकॉम १८’ यांची आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सतीश राजवाडे, सुमित राघवन, इरावती हर्षे, ‘वायकॉम १८’चे निखिल साने आणि नाना पाटेकर यांनी नुकतीच ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. ‘आपला मानूस’च्या बाबतीत पडद्यामागे काय घडले, हा चित्रपट कसा आकाराला आला याचे किस्से ऐकवतानाच मराठी चित्रपटांच्या संहितांपासून ते प्रसिद्धीपर्यंतच्या समस्या, मराठी चित्रपट दिग्दर्शकांची तयारी अशा अनेक विषयांवर या सगळ्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या..

विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. नाटक पाहिलेले नव्हते पण त्याबद्दल खूप ऐकले होते. नाटकावर उत्तम चित्रपट होऊ शकतो, असे वाटल्याने बेळे यांच्याकडे विचारणा केली. चित्रपटाची पूर्वतयारी म्हणून सतीश राजवाडे, बेळे आणि मी आमची चर्चा, बैठका सुरू झाल्या. आम्ही खूप मेहनत घेतली.  पण काही कारणाने वाद होऊन आमचा हा प्रकल्प बंद पडला. काही महिने असेच गेले. मग पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आणि चित्रपटावर आमचे काम सुरू झाले. मुळात नाटकाची कथा उत्तम आणि दमदार असल्याने त्यावर चित्रपट चांगलाच होणार याची खात्री होतीच. मूळ कथावस्तू चांगली असली की त्याचे रूपांतर करता येते. नाटकावरून चित्रपट तयार करताना नाटकाच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का पोहोचणार नाही याची काळजी आम्ही सर्वानीच घेतली असून चित्रपट माध्यमासाठी म्हणून जे काही बदल करायचे असतात ते केले आहेत. ‘आपला मानूस’ ही परस्पर नातेसंबंधांतून उलगडत जाणारी कथा असून ती रहस्यमय थरारक पद्धतीने पुढे सरकते.

चित्रपटात मानवी नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. सध्याच्या काळात कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी असलेला संवाद कमी झाला आहे किंवा तुटत चालला असल्याच्या पाश्र्वभूमीवर हे नातेसंबंधांवरील भाष्य अधिक महत्त्वाचे आणि आवश्यक वाटते. नाटक म्हणून सादरीकरण करताना ज्या काही मर्यादा येतात त्या चित्रपट करताना येत नाहीत. एकाच वेळी हजारो प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचू शक तो. हे चित्रपटाचे एक मुख्य बलस्थान आहे. आणि त्याचा अगदी प्रभावी वापर इथे करण्यात आला आहे. चित्रपट चांगला की वाईट हा नंतरचा प्रश्न आहे. मुळात चित्रपटाबाबत आपले विशिष्ट मत बनविण्यापूर्वी प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तो चित्रपट पहिल्यांदा पाहावा आणि चांगला की वाईट ते ठरवावे. मुळात नाटकाची कथा मनाला भावणारी आणि भुरळ पाडणारी आहे. नाटक किंवा चित्रपट याची कथा सर्वसामान्यांना आपली वाटली पाहिजे. त्यांच्या रोजच्या आयुष्याशी ती जुळणारी आणि निगडित असली आणि सादरीकरणही उत्तम असेल तर तो चित्रपट प्रेक्षकांनाही आपला वाटेल.चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी (प्रमोशन) जाणे मला तरी आवडत नाही. इतकी वर्षे मी या क्षेत्रात काम करतो  आहे. प्रेक्षक मला ओळखतात. माझे काम त्यांना माहिती आहे. मग तरीही माझा चित्रपट पाहायला या, असे मी का सगळीकडे सांगत फिरायचे? माझा म्हणून जो प्रेक्षक आहे तो चित्रपट पाहायला येणारच आहे. अलीकडच्या काही वर्षांत अपवाद वगळता त्या प्रकारचे दर्जेदार चित्रपट तयार झाले का? हा प्रश्नही आहेच. त्यामुळे चित्रपटाचा दर्जा, आशय याची कुठेतरी सांगड घातली गेली पाहिजे.

तुमचा उद्देश चांगला नसेल तर चित्रपट-नाटक किंवा कोणत्याही कलाकृतीविषयी वाद, चर्चा होणारच. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काय  दाखवताय, इतिहास किंवा पुराणातील व्यक्तिरेखा कशा प्रकारे सादर करताय, तेही महत्त्वाचेच आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार किंवा विपर्यास करणे नाही हे लक्षात घेतले पाहिजे.  नाना पाटेकर  

‘ती सध्या काय करते’ नंतर ‘आपला मानूस’चे काम सुरू झाले. पण त्याच दरम्यान ‘मुंबई-पुणे मुंबई’च्या पुढील नवीन भागाची  घोषणा  झाली. एका वेळी एकच काम करायचे, अशी माझी सवय आहे. त्यामुळे ‘ती सध्या काय करते’नंतर ‘आपला मानूस’च्या कामाला सुरुवात केली. चित्रपट तयार केल्यानंतर तो कोणातर्फे, किती प्रेक्षकांपर्यंत आणि कशा प्रकारे पोहोचवणार आहोत यालाही सध्याच्या काळात खूप महत्त्व आहे. चित्रपट कितीही उत्तम असला पण तो सर्वदूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही तर काहीही उपयोग नाही. तुम्ही गोष्ट कशी सादर करता तेही महत्त्वाचे आहे. आज मनोरंजनाची साधने बदलली असून स्मार्ट भ्रमणध्वनीच्या माध्यमामुळे प्रत्येकाच्या हातात मनोरंजनाचे खूप मोठे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटापर्यंत प्रेक्षकांना खेचून आणायचे असेल तर चित्रपट तयार झाल्यानंतर त्याची प्रसिद्धी आणि विपणन (मार्केटिंग) हेही आजच्या  काळात गरजेचे आणि अत्याश्यक आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीत आणि प्रेक्षकांना चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण करण्यात ‘प्रोमो’ आणि ‘टीझर’ यांचे महत्त्वाचे योगदान आहे.    सतीश राजवाडे

‘संदूक’नंतर माझा प्रदर्शित होणारा हा दुसरा मराठी चित्रपट आहे. चित्रपटासाठी मला याआधीही वेळोवेळी विचारणा झाली होती. पण सगळ्या भूमिका या झाडांच्या भोवती पळापळी करणाऱ्या होत्या आणि मला तशा भूमिका करायच्या नव्हत्या. त्यामुळे खूपच कमी चित्रपट मी केले. कोणतीही भूमिका स्वीकारताना संहिता महत्त्वाची. संहिता चांगलीच असली पाहिजे. संहितेबरोबरच येणारा अन्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे करण्यात आलेली कलाकारांची निवड. त्या भूमिकेसाठी योग्य आणि चपखल कलाकाराची निवड करणेही सगळ्यात महत्त्वाचे असते. दुसरे असे की तुम्ही सतत एकसारखे प्रेक्षकांपुढे येणेही योग्य नाही. मराठीपेक्षा हिंदी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत मी जास्त प्रमाणात दिसतो किंवा काम करतो. त्याचे खरे कारण तेथे मिळणारे मानधन हे आहे. मराठीपेक्षा हिंदीतील ‘अर्थ’कारण जास्त आहे. काम नसेल तेव्हा संवादिनी वाजविणे आणि गाणे म्हणणे हे माझे छंद मी जोपासतो.   सुमित राघवन

सर्वानी मेहनत घेऊन तयार केलेला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचलाच नाही तर तो कितीही चांगला असला तरी काहीच फायदा नाही.     इरावती हर्षे

अमेरिकन चित्रपट आणि त्याची प्रसिद्धी, विपणन याची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे अमेरिकन चित्रपट एकाच वेळी सर्वदूर पोहोचतात. मराठी चित्रपटांच्या बाबतीत आपण यात मागे पडतो. आपण उत्साहाने चित्रपट तयार करतो पण तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यासाठी जे काही तंत्र वापरणे गरजेचे आहे त्यात आपण कमी पडतो. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे आणि तो त्यांच्यावर बिंबविणे महत्त्वाचे आणि तरीही कठीण आहे. पण गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट याबाबतीत चांगली कामगिरी करत आहेत. विषयांचे वैविध्य आणि सादरीकरण हे चांगल्या पद्धतीने होत आहे. चित्रपटाचा सूर हा त्याच्या प्रोमोजवरून ठरवला जातो. सूर चुकला की चित्रपटही पडतो. निखिल साने, वायकॉम १८