‘सायकल’ हा आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्यापैकी प्रत्येकाला सायकल म्हटली की लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत सायकल भाडय़ाने आणून केलेली धमाल आठवते. मोठे झाल्यानंतर भरमसाट पैसे मोजून भारी दुचाकी किंवा चारचाकी गाडी घेतली तरीही त्या सायकलची सर त्यांना येत नाही. मनाच्या एका कप्प्यात आपण ती सायकल जपलेली असते. तुमच्या-आमच्या सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेली सायकल हाच या चित्रपटाचा विषय आहे. ‘सायकल’ याच नावाने तयार झालेला हा चित्रपट भावनाप्रधान आहे. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीतही आनंद लपलेला असतो आणि तो साजरा करणे महत्त्वाचे असते, असे हा चित्रपट आपल्याला सांगतो. हॅपी माइंड्स एंटरटेन्मेंटचा ‘सायकल’ कोकणातील एका छोटय़ा गावात घडतो. ‘सायकल’वर जिवापाड प्रेम करणाऱ्या केशवची ही गोष्ट आहे. गावात आलेले दोन चोर ही सायकल चोरतात आणि त्यातून पुढे काय घडते, ते चोर ती सायकल का चोरतात, केशवला त्याची सायकल परत मिळते का?, या सगळ्याची उत्तरे ‘सायकल’ पाहूनच मिळणार आहेत. प्रकाश कुंटे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियदर्शन जाधव, ऋषिकेश जोशी, भाऊ कदम यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असून भाऊ कदम त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ने हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. ‘सायकल’ चित्रपटाच्या चमुने नुकतीच ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली. त्या भेटीचा वृत्तान्त..
सायकल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची
‘सायकल’ आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची असून संपूर्ण चित्रपट त्या सायकलवरच आहे. चित्रपटातील तीन मुख्य भूमिकांसाठी ऋषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम यांचीच नावे डोळ्यासमोर होती. एखादी घटना घडते त्या घटनेच्या पलीकडे जाऊन वेगळे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न ‘सायकल’मध्ये केला आहे. – प्रकाश कुंटे, दिग्दर्शक
प्रत्येक पिढीची गोष्ट
‘सायकल’ चित्रपटाची कथा मला माझ्या वडिलांमुळे सुचली. त्यांना सायकलीचे खूप वेड. त्यांच्या काही सायकली चोरीला गेल्या तेव्हा त्यांची काय अवस्था झाली, ते किती हळवे झाले ते मी पाहिले होते. त्यांचा सायकलीवर खूप जीव होता. आपण आपल्या जवळच्या माणसाप्रमाणे ज्या वस्तूवर प्रेम करतो, जीव लावतो ती वस्तू जर चोरीला गेली तर काय होईल, हे यात वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऋषिकेश जोशी या चित्रपटात ज्योतिषाच्या भूमिकेत आहे. – आदिती मोघे, चित्रपटाच्या लेखिका
आणि ही गोष्ट ज्योतिषाची झाली
चित्रपटात आधी ‘पोस्टमन’ ही व्यक्तिरेखा होती. पण मला ती पोस्टमनची गोष्ट वाटली नाही. पोस्टमन हा त्या काळी सर्वाच्या जिव्हाळ्याचा असला तरी त्याचा प्रवेश थेट स्वयंपाकघरापर्यंत नव्हता. त्या काळी ज्योतिषी अशी व्यक्ती होती की त्याचा संपर्क घरातील प्रत्येकाशी यायचा, तो घरात सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत होता. त्यामुळे पोस्टमनऐवजी ज्योतिषी ही व्यक्तिरेखा घ्यावी, असे सुचवले आणि सर्वाना ते आवडले. मराठीत आजपर्यंत ज्योतिषी या व्यक्तिरेखेभोवती गुंफलेली कथा आणि चित्रपट आलेला नाही. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही जिवंत झाली असून यातील पात्रे तुमच्या आजूबाजूला वावरणारी आहेत असे हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल. हिंदीत बहुतांश मसाला चित्रपटच तयार होतात. वेगळ्या विषयावर हिंदीतही चित्रपट बनतात, पण अपवाद वगळता ते स्वीकारले जात नाहीत. मराठी प्रेक्षकांचे तसे नाही. वेगळा विषय, आशय असलेल्या चित्रपटांचे आपल्याकडे स्वागतच होते. मुळात मराठी प्रेक्षकांना कथा सशक्त आणि दर्जेदार हवी असते. ती त्याला पटावी आणि आपलीशी वाटावी लागते. एखादा गंभीर विषय उपहासात्मक किंवा तिरकसपणे मांडला की तो विषय प्रेक्षकांपर्यंत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचतो. – ऋषिकेश जोशी, अभिनेता
वेगळ्या प्रकारची ‘ब्लॅक कॉमेडी’
‘सायकल’ चित्रपटातील भूमिका माझ्या आजवरच्या प्रतिमेला आणि शैलीला छेद देणारी आहे. वेगळ्या विषयावरील चित्रपट आणि भूमिका ‘सायकल’मुळे मला करायला मिळाली. हा चित्रपट म्हणजे वेगळ्या प्रकारची ब्लॅक कॉमेडी आहे. एक कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मला आवडते. काही वेगळ्या भूमिका मी याआधीही केल्या. पण प्रत्येक वेळी त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याच असे नाही. पण तरीही अशा वेगळ्या भूमिकेच्या मी नेहमीच शोधात असतो. ‘सायकल’मुळे मी वेगळी भूमिका करू शकतो असे मला वाटते. प्रेक्षकांनाही तसे वाटेल असा विश्वास वाटतो. – भाऊ कदम, अभिनेते
आम्ही दोघे ‘चांगले’ चोर
‘सायकल’ चित्रपटात मी आणि भाऊ चोरांच्या भूमिकेत आहोत. आम्ही दोघेही ‘चांगले’ चोर आहोत. खरे म्हणजे आम्हाला ती सायकल चोरायची नसते, पण झालेल्या एका गोंधळामुळे ती आमच्याकडे येते आणि पुढे काय घडते ते चित्रपटात मजेदार पद्धतीने सादर केले आहे. मराठी चित्रपट खूप ‘बोलतात’. खरे तर चित्रपटात संवाद कमी आणि प्रसंग जास्त असले पाहिजेत. मी अभिनेता तर आहेच, पण त्याच बरोबर लेखक, दिग्दर्शकही आहे. मला ब्लॅक कॉमेडी करायला जास्त आवडते. – प्रियदर्शन जाधव, अभिनेता
सर्वानी सांभाळून घेतले
‘सायकल’ चित्रपटात मी ‘केशव’ ज्योतिषी यांच्या पत्नीची भूमिका करत आहे. ‘सायकल’ चोरीला गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय परिणाम होतो, ते यात मांडले आहे. कसलेल्या अभिनेत्यांसोबत काम करायचे असल्याने सुरुवातीला थोडे दडपण होते. पण सर्वानी सांभाळून घेतले. – दीप्ती लेले, अभिनेत्री
धमाल केली
चित्रीकरणप्रसंगी आम्ही खूप धमाल केली. माझी यात केशव ज्योतिषी यांच्या छोटय़ा मुलीची भूमिका आहे. मजा, मस्ती करत काम केल्यामुळे चित्रीकरण करतोय असे कधीच वाटले नाही. – मैथिली, बाल कलाकार
संकलन- शेखर जोशी, छाया- दिलीप कागडा