नाव जरी महाविद्यालयाचे असले तरी त्या महाविद्यालयातील नाटक करणारा समूह हा वेगळ्या नावाने ओळखला जातो. नाटकाशी साधम्र्य साधणारे काही तरी नाव अशा महाविद्यालयीन नाटय़संस्थांना दिले जाते. याच प्रवाहातूनआज अनेक महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र नाव असलेल्या नाटय़संस्था पाहायला मिळतात. या संस्था महाविद्यालयाचाच एक भाग असल्या तरी विद्यार्थी जगतात मात्र या संस्थांची स्वतंत्र ओळख पाहायला मिळते. महाविद्यालयातील या नाटय़संस्था म्हणजे ‘नाटक’ उलगडून सांगणारे एक विद्यापीठच असते. जिथे अभिनयापासून ते पडद्यामागची धावपळ यांचे संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळते. के वळ नाटकच नाही तर समाजात माणूस म्हणून वावरताना गरजेची असलेली जीवनमूल्येही याच तालमीतून मिळत असतात. आणि याच संस्कारातून मग कु णी मोठा दिग्दर्शक होतो तर कु णी अभिनेता. महाराष्ट्रातील अशाच काही नाटय़संस्था दरवर्षी लोकांकिकांचा भाग होत असतात. यंदाच्या वर्षीही अशा अनेक महाविद्यालयीन नाटय़संस्था ‘लोकसत्ता लोकांकिको’ स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. त्यातील काही नाटय़संस्थांची ही थोडक्यात तोंडओळख..

दिग्गजांचे आगार आणि नाटय़साक्षरतेवर भर. 

आज लोकांना माहिती असलेले ‘रुईया नाटय़वलय’ पूर्वी ‘रुईया ड्रॅमॅटिक सर्क ल’ या नावाने ओळखले जायचे. १९३७ साली या ‘ड्रॅमॅटिक सर्क ल’ची स्थापन करण्यात आली होती. आज ८० वर्षांहून अधिक काळ ही नाटय़चळवळ रुईया महाविद्यालयात अव्याहत सुरू आहे. या नाटय़चळवळीतून अरुण सरनाईक, दिलीप प्रभावळकर, कांचन चिटणीस, वंदना गुप्ते, स्मिता तळवलकर, विनय आपटे, शिल्पा तुळसकर, संजय नार्वेकर, निशिकांत कामत, चंद्रकांत कु लकर्णी, अभिजीत पानसे, गजेंद्र अहिरे, क्रांती रेडकर, स्पृहा जोशी, मनवा नाईक, अदिती सारंगधर, क्षिती जोग आणि असे किती तरी नामवंत कलावंत नाटय़-सिने सृष्टीला मिळाले. शम्मी कपूर देखील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

‘नाटय़वलय’तर्फे  सादर के ल्या जाणाऱ्या एकांकिका के वळ  स्पर्धेपुरत्या मर्यादित राहत नाहीत तर स्पर्धेनंतरही त्याचे काही प्रयोग रसिकांसाठी लावले जातात. ‘रुईयांक’ हा याचाच एक भाग आहे. जुन्या काही आणि नवीन काही अशा गाजलेल्या एकांकिकांचे समीकरण करून हा नाटय़महोत्सव के ला जातो. नाटय़वलयमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना के वळ अभिनयच शिकवला जात नाही तर त्यांना नाटय़साक्षर के ले जाते. त्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे ही आजी-माजी विद्यार्थ्यांची संस्था आहे. आजही अनेक माजी विद्यार्थी नाटय़वलयशी जोडलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा कायम नवीन मुलांसोबत असतो. आजवर मानाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धाचे जेतेपद रुईया नाटय़वलयने मिळवले आहे. ‘संगीत मूकनायक’, ‘सातच्या आत घरात’, ‘मंजुळा’, ‘ग म भ न’, ‘अखेरचा ऱ्हास’, ‘अनन्या’, ‘मुक्तिधाम’, ‘संगीत घागरे के  पीछे’, या गाजलेल्या एकांकिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत.

रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई</p>

प्रात्यक्षिकावर जोर देणारा नाटय़शास्त्र विभाग

औरंगाबाद येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नाटकाच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. महाविद्यालयात नाटय़शास्त्र नावाचा विभाग असून तेथे तीन वर्षांचा नाटय़शास्त्राचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. नाटकाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘रंगफौज’ नावाची नाटय़संस्था स्थापन केली आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठाच्या नावाने तर प्रायोगिक पातळीवर ‘रंगफौज’ नावाने नाटक उतरवले जाते. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे प्राथमिक लक्ष्य एकांकिका स्पर्धा नसून अभ्यास करण्यापुरतेच मर्यादित असते. परंतु आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनामुळे हे चित्र आता बदलते आहे.  ‘लोकांकिका’ स्पर्धेत गेली चार वर्षे मराठवाडा विद्यापीठाचे नाव गाजते आहे. नाटकासाठी संहिता लिहिणे, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, संवाद याविषयी नाटय़संस्थेचे आजी-माझी विद्यार्थी मार्गदर्शन करतात. नाटक करताना नव्या-जुन्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. वर्षभर विविध चर्चासत्र, परिसंवाद याचे आयोजन केल जाते. त्यामुळे पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकावर जास्त भर देण्यात येतो. चंद्रकांत कुलकर्णी, योगेशे शिरसाट, मकरंद अनासपुरे, रोहित देशमुख असे लोकप्रिय चेहरे याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी विद्यापीठाच्या ‘मादी’ आणि ‘भक्षक’ या एकांकिकोंनी अनेक स्पर्धाचे विजेतेपद पटकावले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद</p>

नवीन पिढी घडवणारे कलामंडळ

पुण्यातील सर परशुराम म्हणजेच ‘एसपी महाविद्यालया’स ६२ वर्षांची नाटय़परंपरा लाभली असून इथे अनेक  उत्तम कलाकार घडले आहेत. महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांंनी एकत्र येऊन ‘कलामंडळ’ या नाटय़संस्थेची स्थापना केली. आज आमच्या नाटय़संस्थेत कलादिग्दर्शन, संगीत, कपडेपट, मेकअप, ध्वनियोजना, नेपथ्य, प्रकाशयोजना या विभागात आपली भूमिका चोख बजावणारी मंडळी आहेत. फक्त अभिनयच नाही इतर तांत्रिक बाबी सांभाळण्याचे काम त्या त्या विद्यार्थ्यांला देण्यात येते. अनेक एकांकिका स्पर्धावर एसपी महाविद्यालयाने मोहोर उमटवली आहे. मृण्यमी देशपांडेच्या ‘पोपटी चौकट’ या एकांकिके नेपुरुषोत्तम करंडक पटकावला होता. त्यानंतर नाटकाची योजनाबद्ध प्रक्रिया सुरू झाली. वर्षांच्या सुरुवातीस नाटकाच्या विषयाची चर्चा केली जाते. नंतर नाटकाच्या विविध अंगांची चर्चा करून विषय निश्चित केला जातो. क्षितिज दाते, सुमित संघमित्र यांच्या ‘प्राणीमात्र’ या एकांकिकेनेही पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. गायक जसराज जोशी याने कलामंडळाकडून ‘आयआयटी’च्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवात गाण्याचे सादरीकरण केले होते. तेव्हा त्यांना पारितोषिक मिळाले. पुण्यातील विद्यार्थ्यांचा बँड आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात सहभागी होणे हीच पुणेकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट होती. महाविद्यालयातील स्टुडंट्स हॉल येथे कलामंडळाच्या तालमी होतात. विद्यार्थ्यांना घरापेक्षाही जवळची अशी कलामंडळाची जागा सर्व नाटय़कर्मीमध्येही अतिशय प्रिय आहे. यावर्षी आमच्या ‘ऐनवरम’ या एकांकिकेने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा टप्पा पार के ला असून आता विभागीय अंतिम फेरीसाठी सज्ज आहोत.

एसपी महाविद्यालय, पुणे</p>

व्यक्तिमत्त्वास आकार देणारे सांस्कृतिक केंद्र

कोकणातील सांस्कृतिक केंद्र म्हणून ‘डीबीजे महाविद्यालया’कडे पाहिले जाते. डीबीजे महाविद्यालयास १९७० पासून नाटय़परंपरा लाभली आहे. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग वर्षभर क्रियाशील असतो. जून-जुलै महिन्यात मुलांचा प्रवेश झाल्यावर नाटकात काम करू इच्छिणाऱ्या मुलांना संधी दिली जाते. सध्या २० मुलांचे तीन गट असून राज्यभरातील विविध एकांकिका स्पर्धेत ते उतरतात. कोकणातील महाविद्यालयात मुंबई-पुण्यासारखे नाटकासाठी पोषक वातावरण नसतानाही मुले वर्षभर कसून तालमी करतात. सकाळी वर्ग संपल्यानंतर दुपारी नाटकाची तालीम घेण्यात येते. त्यांना अभिनय, ध्वनी, दिग्दर्शन कला यासारख्या विविध गोष्टींची ओळख करून देण्यात येते. मुलांना विविध नाटके दाखवण्यात येतात. ‘लोकांकिका’ स्पर्धेत महाविद्यालयातर्फे ‘कबूल है’ या एकांकिके ने महाअंतिम फेरीत लेखनाचे पारितोषिक मिळवले होते. ओंकार भोजने, साक्षी गांधी, संकेत हळदे हे माजी विद्यार्थी आता हिंदी-मराठी चित्रपट-मालिकेत काम करत आहेत. वर्षांतून एकदा या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकांकिका’ स्पर्धेत दरवर्षी विषयाचे नावीन्य जपले जात असल्याने ही स्पर्धा वेगळी ठरली आहे. यंदा प्रथमच ‘विज्ञान’ एकांकिके द्वारे वेगळा प्रयोग करण्याचा विचार करण्यात आला आहे.

डीबीजे महाविद्यालय, चिपळूण

संकलन – मानसी जोशी, नीलेश अडसूळ