‘दिल की धडकने..’ हे िहदी चित्रपटांमधून न जाणे किती वेळा आपण ऐकले असेल. पण त्या धडधडणाऱ्या हृदयाचा एक एक ठोका किती महत्त्वाचा असू शकतो. त्याची धडधड टिकून रहावी म्हणून काळ-वेगाचे गणित साधून विज्ञानाच्या तंत्राने इये हृदयिचे तिये घातले..हे प्रत्यक्षात साधण्याची जबाबदारी जेव्हा काही काळापुरती त्या परिघात असलेल्या व्यक्तींवरती येऊन पडते तेव्हा खरे म्हणजे मनात दाटणाऱ्या भावनांचीच गर्दी जास्त. या गर्दीला मागे सारत एका जिवंत हृदयाची धडधड थांबवून दुसऱ्या विझत्या जिवाला वाचवण्याची धडपड महत्त्वाची ठरते.

२०११ साली आलेल्या ‘ट्रॅफिक’ या मल्याळम चित्रपटाचा िहदी रिमेक असलेल्या या चित्रपटाचा मूळ विषयच नाटय़पूर्ण आहे. मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश पिल्लई यांनी केले होते. िहदी ‘ट्रॅफिक’चे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र चित्रपट प्रदíशत होण्याआधीच त्यांचे निधन झाले. या सगळ्या पाश्र्वभूमीवर विषयानुरूप या चित्रपटाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हृदयरोपणाच्या यशस्वी कथा आपण गेले तीन-चार र्वष सातत्याने ऐकतो आहोत. त्यासाठी ग्रीन कॉरिडोर करून यशस्वीपणे एकाचे जिवंत हृदय दुसऱ्या शहरातील रुग्णालयात असलेल्या रुग्णापर्यंत पोहोचवणे हे आव्हान पेलणाऱ्यांच्या गोष्टीही आपण वाचलेल्या असतात. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही रुग्णांकडची बाजू, त्यांच्या नातेवाईकांची भावावस्था, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न याचबरोबर रस्त्यावरचे ट्रॅफिक मोकळे करून देणारे वाहतूक पोलीस अशा कित्येक व्यक्तींची त्यावेळची अवस्था हे सगळे विषय चित्रपटात ओघाने येतात.

रेहान हा एका वृत्तवाहिनीवर नव्यानेच काम सुरू करणारा तरुण, त्याच्यावर देव कपूर (प्रोसेनजीत) या सुपरस्टारची मुलाखत घेण्याची जबाबदारी येऊन पडते. देवच्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिला भेटण्यासाठी पुण्याला निघालेल्या देवला विमानतळावर पाच मिनिटांसाठी गाठण्याची रेहानला घाई आहे. रेहान आणि त्याचा मित्र राजीव बाईकवरून निघतात. मात्र त्यांचा अपघात होतो आणि रेहानच्या मेंदूला जबर मार बसल्याने त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित केले जाते. रेहान व्हेंटिलेटरवर आहे, पण जिवंत आहे. तर दुसरीकडे देवच्या मुलीला रियाला हृदयाची गरज आहे. काही तासांत तिला नवीन हृदय मिळाले नाही तर ती मरणार आहे. या परिस्थितीत रेहानचे आयुष्य उरलेले नाही हे वास्तव मान्य करूनही त्याचे व्हेंटिलेटर काढून त्याचे हृदय रियासाठी देण्याचा निर्णय त्याच्या आई-वडिलांसाठी सोपा नाही. इथे रेहानच्या आई-वडिलांच्या भूमिकेत त्यांची तगमग सचिन खेडेकर आणि किटू गिडवानी यांनी समर्थपणे पेलली आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतरही मुंबईच्या ट्रॅफिकची कल्पना असलेल्या वाहतूक पोलीस संचालक (जिम्मी शेरगिल) अडीच तासांत हे हृदय मुंबईतून पुण्यात पोहोचवण्याचे आव्हान घ्यायला तयार नाही.

वाहतूक पोलिसांची एक टीम सज्ज होते हे मिशन पूर्ण करायला. मुख्य जबाबदारी घेतली आहे ती ट्रॅफिक हवालदार असलेल्या रामदास गोडबोलेने (मनोज वाजपेयी). त्याचा स्वत:चा वाईट भूतकाळ आहे आणि त्याही अर्थाने तो या मिशनशी जोडला गेला आहे. एवढय़ा सगळ्या नाटय़पूर्ण व्यक्तिरेखा आणि वास्तव घटनांमध्येच इतके नाटय़ दडलेले असतानाही दिग्दर्शकाने काल्पनिक गोष्टींचा इतका भडिमार केला आहे की खरी घटना असूनही ती चित्रपटापुरती घडवल्यासारखी वाटत राहते. हे या चित्रपटाचे मोठे अपयश ठरले आहे. एक सुंदर सत्यघटना आणि आजवर त्याच्या अवतीभोवतीच्या न लक्षात आलेल्या घटनांना योग्य रीतीने पकडूनही कल्पिताच्या अट्टहासाने वाहवत जात दिग्दर्शकाने चित्रपट अतिरंजित केला आहे. त्यामुळे खरे तर चित्रपट इतिहासात मलाचा दगड ठरला असता असा हा चित्रपट दखल घेण्याइतकाही विश्वासार्ह ठरत नाही.

ट्रॅफिक

दिग्दर्शक – राजेश पिल्लई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकार – मनोज वाजपेयी, जिम्मी शेरिगल, सचिन खेडेकर, किटू गिडवानी, दिव्या दत्ता, प्रोसेनजित चॅटर्जी, परमब्रत चॅटर्जी, अमोल पराशर.