दिलीप ठाकूर
बरोबर १९८४ च्या मध्यावरची गोष्ट.  राजश्री प्रॉडक्शन्सच्या वतीने आम्हा सिनेपत्रकारांना आमंत्रण आले, आगामी चित्रपट ‘अबोध’च्या नवीन चेहर्‍यांशी भेट घालून देण्यासाठीची मरीन ड्राइववरील एका तारांकित हॉटेलमध्ये ‘टी पार्टी’. कलाकार तापस पॉल व माधुरी दीक्षित. या ‘टी पार्टी’त आपल्या आई-बाबांसोबत अंधेरीतील जे. बी. नगरवरुन आलेली माधुरी एखादी शाळकरी युवती वाटली. पण तिच्या वागण्या-बोलण्यातील विलक्षण अभिमान, हिंदी चित्रपट असूनही मराठीत गप्पा करण्याचा स्वभाव व तिच्या चेहर्‍यावरचे कायमस्वरुपी हास्य हे गुण प्रकर्षाने लक्षात आले. काही दिवसांनी ‘अबोध’चा समिक्षकांसाठीच्या खेळासाठी माधुरी मध्यंतरमध्ये आली. आपल्या पहिल्याच चित्रपटाबाबत समिक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात तिला उत्सुकता जाणवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अबोध’ ते ‘बकेट लिस्ट’ आणि अर्थातच आणखीन बरेच पुढे अशा माधुरीच्या चौफेर, अष्टपैलू, मेहनती प्रवासाबद्दल खरं तर ‘मै माधुरी दीक्षित’ नावाचा मनोरंजन व माहिती असा चरित्रपट नवीन पिढीसाठी आदर्श ठरेल. सचिन तेंडुलकरच्या सहभागाचा आपण असाच चित्रपट पाहून विलक्षण भारावूनही गेलो. रामगोपाल वर्माने चित्रपटसृष्टीत येऊ इच्छिणाऱ्या युवतींवरचा माधुरीच्या ‘धक धक गर्ल’ आणि एकूणच यशाचा प्रभाव विचारात घेऊन ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू ‘ हा चित्रपट निर्माण केला या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचे सर्वोत्तम स्थान आणि गुण याना त्याने जणू रुपेरी सलाम केला असे म्हणायला हवे. अंतरा माळीने त्यात माधुरी दीक्षित बनण्याचे स्वप्न पाहिले.माधुरीने स्वतःला घडवलेय व ते करतानाच तिने मराठी रसिक मनाला सांस्कृतिक अभिमान दिला. हे तिचे देणे खरं तर न मोजता येणारी गोष्ट आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्रीचा प्रवास खूपच मोठा आहे. माधुरी चित्रपटात येण्यापूर्वीपासूनचा आहे. अगदी उल्लेखनीय देखील आहे. पण माधुरीने सर्वोच्च शिखर गाठून मराठी माणसाचा स्वाभिमान जागा केला. तिच्या चाहत्यांत जगभरातील अनेक भाषिक आहेत. पण मराठी मनाला ‘आपली माधुरी’ वाटते हे जास्तच कौतुकास्पद आहे. त्याचा तो भावनिक, मानसिक, बौद्धिक आनंद आहे.  पडद्यावरची, सेटवरची, नृत्यातील, नात्यांतील, कुटुंबातील, मिडियातील, गॉसिप्समधील अशी ‘माधुरी दीक्षित’ची खूप रुपे आहेत. या प्रवासात तिच्या वागण्यातील सहजता, आपुलकी कायम राहिलीय. ही खूपच अवघड गोष्ट असून माधुरीने मात्र जपली. ‘तेजाब’च्या मेहबूब स्टुडिओतील ‘एक दो तीन चार पाच…’ गाण्याच्या सेटवर भेटलेली माधुरी व ‘गुलाबी गँग’च्या प्रमोशनच्या मुलाखतीच्या वेळेस भेटलेली माधुरी यामध्ये पंचवीस वर्षांचा कालावधी गेला. पण माधुरी तीच होती. यशाने तिच्या मूळ स्वभावात फरक पडला नव्हता. कोणत्याही क्षेत्रात असणारा हा दुर्मिळ गुण.

‘साजन’च्या वेळेस निर्माता सुधाकर बोकाडेने माधुरीची एक चांगली गोष्ट मला सांगितली. चित्रपटाच्या आऊटडोअर्सना लहान-मोठे सगळेच कलाकार निर्मात्याच्या खर्चानेच कपडे इस्रीला टाकतात. माधुरी एकमेव स्टार जी आपले व आपल्या कुटुंबियांचे लॉन्ड्रीचे बिल स्वतः भरते. तर ‘मोहरे’चे निर्माते रघुवीर कुल आजही सांगतात, तीस वर्षांनंतरही माधुरीच्या वागण्यात फरक नाही. प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीतील अनेकांकडून माधुरीबद्दल असे सकारात्मक ऐकायला मिळते. माधुरीने दिलीपकुमारपासून (‘इज्जतदार’ चित्रपट) रणबीर कपूरपर्यंत तीन पिढ्यांच्या कलाकारांसोबत भूमिका साकारल्यात. आजच्या पिढीतील जवळपास सर्वच अभिनेत्रींचे वय माधुरीच्या करियरच्या वयापेक्षाही कमी आहे. पण माधुरीच्या चेहर्‍यावरचे हास्य, तिचा फिटनेस, तिची लोकप्रियता, मिडियाचे तिच्यावरचे लक्ष व तिची मागणी कायम आहे. माधुरीच्या यशात नृत्य, त्यासाठीचे अथक परिश्रम, व्यावसायिक वृत्ती व इतरांना समजावून घेण्याचा स्वभाव अशा अनेक गोष्टी आहेत. तिचे किती व कोणते चित्रपट सुपर हिट वा फ्लॉप ठरले याच्या हिशोबापलिकडे जाऊन माधुरीचा प्रभाव आहे. ‘हम आपके है कौन’मधील ती ‘ओपन बॅक’ चोलीत नखशिखांत मोहक  आणि मादक दिसते. तिच्या याच ड्रेसला फॅशन म्हणून स्वीकारले गेले. यश चोप्रांचा ‘दिल तो पागल है’ हा गीत-संगीत-नृत्य या माध्यमातून खुललेला चित्रपट तिच्या अभिनय, नृत्य व सौंदर्य याची छान प्रचिती देतो.

माधुरी दीक्षित एका दिवसात वा शॉर्टकटने बनत नसते. कलेच्या क्षेत्रात जवळचा वगैरे मार्ग नसतो. चित्रपट तर टीमवर्क आहे. आपल्या मेकअपपासून त्याची सुरुवात होते. आपले चित्रपट यशस्वी होत असतानाच इतरांचीही यशाची ‘मनिषा ‘ पूर्ण होत असते. प्रेक्षकांचीही पिढी बदलते. लग्नानंतर अमेरिकेत काही काळ राहणे,  दोन मुलांची आई होण्याचा आनंद घेत पुन्हा बॉलीवूडमध्ये परतणे आणि पुन्हा या सार्‍यातून आपले स्थान टिकवायचे… म्हटलं ना, माधुरीचे यश सहजी मोजता न येणारे आहे. आजच्या तिच्या वाढदिवसानिमित्त हा त्याचाच जणू ट्रेलर.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit birthday blog by dilip thakur
First published on: 15-05-2018 at 11:45 IST