हिंदी सिनेसृष्टीवर एकहाती अधिराज्य गाजवणारी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित लवकरच ‘बकेट लिस्ट’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मराठीतले अनेक नावाजलेले कलाकार या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. अनेक वर्षांनी माधुरीला मराठमोळ्या लूकमध्ये पाहून अनेकांना सुखद धक्का दिला आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘धर्मा प्रॉडक्शन’ म्हणजेच करण जोहर हे हिंदीतील नाव मराठीशी पहिल्यांदाच जोडले गेले आहे. ट्रेलरमध्ये माधुरीहून नजर एकाक्षणासाठीही हटत नाही.

‘बकेट लिस्ट’मध्ये माधुरीने चाळिशीतील गृहिणीची भूमिका केली आहे. सिनेमाच्या कथेत सई नावाच्या वीस वर्षीय तरुणीची कथा आहे. हृदयदान करणाऱ्या या तरुणीच्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार माधुरीच्या व्यक्तिरेखेने केला आहे. सईच्या इच्छा पूर्ण करताना येणाऱ्या गंमती आणि अडचणी या बकेट लिस्टमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. ट्रेलरच्या शेवटी रणबीर कपूरचीही झलक पाहायला मिळते. माधुरीचा चाहता असलेल्या रणबीरने ‘बकेट लिस्ट’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली असून यात तो चक्क मराठीतून बोलतानाही दिसणार आहे.

२५ मे ला ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीचा माहोल असतानाच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बकेट लिस्ट… माझी, तुमची… आपल्या सगळ्यांची,’ अशी या सिनेमाची आकर्षक टॅगलाइन आहे. या टॅगलाइनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमातून अभिनेत्री रेणुका शहाणेचीही महत्त्वपूर्ण भूमिका पाहता येणार आहे. यापूर्वी माधुरी आणि रेणुका यांनी ‘हम आपके है कौन’ मध्ये त्या दोघींनी सख्ख्या बहिणींची भूमिका साकारली होती.

दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज् आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. तेजस देओस्कर दिग्दर्शित हा सिनेमा तुमची, आमची सगळ्यांचीच बकेट लिस्ट पूर्ण करायला सज्ज झाला आहे, असंच म्हणावं लागेल.