बॉलिवूडवर एक काळ अनभिषिक्त साम्राज्य स्थापन करणारी ‘धक धक कन्या’ माधुरी तिच्या मायमराठी चित्रपटसृष्टीत कधी येणार, हा प्रश्न तिच्या मराठी चाहत्यांना थेट ‘तेजाब’पासूनच पडला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दिसामासांनी तिचे वाढत गेलेले साम्राज्य बघून सुखावणारा मराठी प्रेक्षक आज ना उद्या माधुरी मराठीत संवादफेक नक्की करेल हा विश्वास मनी बाळगून होता. परंतु डॉ. श्रीराम नेन्यांचा हात धरून सप्तपदी चालल्यानंतर साता समुद्रापार गेलेली माधुरी तीन वेळा हिंदीत परतली. पण मराठीत कधी येणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. आता मात्र ‘मी नशिबावर सोडून दिले आहे’, असा सूर माधुरीने लावला आहे.
मराठीत कधी काम करणार, असा थेट प्रश्न विचारल्यावर माधुरीने त्यावर स्पष्ट उत्तर दिले नाही. नशिबावर भार टाकून तिने प्रश्न टाळला. वास्तविक माधुरीला काही दिवसांपूर्वी एका मराठी चित्रपटासाठी विचारणा झाली होती. भूमिका, कथा आदी गोष्टी जुळल्या होत्या. परंतु ‘फायनान्सर’ न मिळाल्याने तो प्रकल्प बारगळला होता. आता पुन्हा चांगली कथा, पटकथा, सशक्त भूमिका आणि फायनान्सर असा ‘मणिकांचन’ योग कधी जुळून येतो ते पाहायचे! कोणी येतच नाहीये चांगला मराठी चित्रपट घेऊन, अशी माधुरीची तक्रार आहे. मराठी निर्मात्यांनो, ऐकताहात ना माधुरीची तक्रार?
भारतात परतल्यानंतर माधुरीने जाहिरातींमध्ये काम करण्याचा धडाका लावला. नाही म्हणायला त्यातील ‘एक्स्पर्ट’ या भांडी घासण्याच्या साबणाच्या जाहिरातीत माधुरीने ‘मराठमोळ्या मोलकरणी’ची भूमिका केली. मराठी मुलीची भूमिका करण्यासाठी तिला नेमकी मोलकरीणच आठवली यामुळे तमाम मराठीजन माधुरीवर तेव्हा संतप्त झाले होते. आता ती  ‘ओरल बी’ टूथपेस्टच्या जाहिरातीत चमकते आहे आणि या टूथपेस्टचे प्रमोशन करण्यासाठीही मदत करते आहे. खळखळून हसणारी माधुरी ही आबालवृद्धांची काळजातील जखम आहे. हेच ओळखून ‘ओरल बी’ने माधुरीला आपली ‘हास्य अधिकारी’ बनवले आहे. म्हणजे आता स्वत:चे निखळ हास्य टिकविण्यासाठी माधुरी तुमच्या आमच्या बत्तीशीसाठी काय चांगले काय वाईट हे सांगत फिरणार आहे. अशाच एका कार्यक्रमात माधुरी उपस्थित होती. एक्स्पर्टच्या जाहिरातीनंतर तिने ओले क्रीम, ओरल बी अशा मोजक्याच ब्रॅण्डसाठी जाहिराती केल्या. याबाबत माधुरीला विचारल्यावर ती म्हणाली की, लोकांना काय वाटेल याचा सतत विचार करून ब्रॅण्ड किंवा चित्रपट निवडणे मला परवडणारे नाही. किंबहुना मला त्या वेळी जे पटतं, माझ्या वयाला, रूपाला योग्य वाटेल तेच काम निवडण्यावर माझा भर आहे. ‘घागरा’सारखं आयटम साँग केलं कारण रणबीरबरोबर असे एखादेच गाणे करायला मजा येईल असे वाटले आणि सहज म्हणून मी ते केले. पण माझे खरे लक्ष आता ‘गुलाबी गँग’ आणि ‘देढ इश्कियाँ’ या चित्रपटांकडे आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण झाले असल्याने माधुरी सध्या ओरल बीच्या टूथपेस्टमुळे तुम्हाला काय फायदे होतील याचे धडे देताना दिसणार आहे.