करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील आपली सुजाणता विसरून काही लोक बाहेर फेरफटका मारायला हमखास जात आहेत. अशा लोकांसाठी नेहमी सर्वांना हसवणाऱ्या महाराष्ट्र हास्यजत्रेच्या टीमने प्रेक्षकांना व्हिडीओद्वारे महत्त्वाचा संदेश दिला आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे कलाकार, तंत्रज्ञ आणि कार्यक्रमाची संपूर्ण टीम यांनी मिळून ही कलाकृती सादर केली आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचा मान राखून तरी सर्वांनी घरी बसून स्वत:चं व देशाचं रक्षण करावं असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. ‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचा कोणी जात नाही’, अशा शब्दांत या कलाकारांनी लोकांना सध्या घरी राहण्याचं महत्त्व पटवून देत आहेत.
आणखी वाचा : राजकुमार रावकडून रोजंदारी कामगारांना आर्थिक मदत
भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.