आपल्या कलाकृतीतून कलाकार पूर्वी व्यवस्थेलाच थेट प्रश्न विचारायचे. ‘जिन्हे नाझ है हिंदू पर वो कहाँ है’ हे साहिर लुधियानवीचे गीत म्हणजे व्यवस्थेला विचारलेला तिखट प्रश्नच आहे. आपल्याच कलंदरपणामध्ये असलेले त्यावेळचे कलाकार ‘एकला चलो रे’ वृत्तीचे होते. आता कलाकारांना लोकांच्या गर्दीत राहणं अधिक सुरक्षित वाटते, अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांनी सद्य:स्थितीवर मंगळवारी भाष्य केले. सुरक्षित कोशामध्ये राहिल्यामुळेच कलाकारांचा विद्रोह क्षीण झाला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
‘ख्वाबों का सफर’ या एपिक वाहिनीवरून प्रसारित मालिकेसंदर्भात भट यांनी मनमोकळा संवाद साधला. संगीतमरतड पं. जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज या वेळी उपस्थित होत्या. देशातील असहिष्णू वातावरण आणि साहित्यिकांचे पुरस्कार परत करण्यासंदर्भात भट यांनी भाष्य केले.
विरोध, विद्रोह हा कलाकाराचा स्थायीभावच असतो. तो सुरात सूर मिसळत नाही. कलाकाराला विरोध करण्याचा अधिकार असतो. तो अधिकार लोकशाहीनेच दिलेला आहे. या अधिकारातूनच कलाकार हा व्यवस्थेला प्रश्न विचारत असतो, असे सांगत भट यांनी ‘ए दिल है मुश्कील जिना यहाँ’ हे मजरुह सुलतानपुरी यांचे गीत सामान्य माणसाच्या मानसिकतेचेच निदर्शक असल्याचे सांगितले. केंद्रामध्ये भाजप सरकार आल्यानंतर असहिष्णुतेचे वातावरण झाले असे नाही. तर, ते पूर्वीपासूनच होते. राजकारणाकडे तुम्ही कसे पाहता यावर तुमची मते तयार होतात, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार परत करणे हा कलाकाराच्या अभिव्यक्तीचा भाग आहे. त्यामुळे पुरस्कार परत करायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. कलाकार आणि साहित्यिकांमधील काही लोक राजकीय विचारधारेचे असतील. पण, सगळेच तसे असतील असेही नाही. पुरस्कार परत करण्याबद्दल कोणाला तक्रार असेल तर मला त्याबाबत काही तक्रार नाही. ‘जख्म’ चित्रपटासाठी मला मिळालेला पुरस्कार मी स्वीकारण्यासाठी गेलो नव्हतो. मात्र, ‘कन्या’ हा पुरस्कार घेण्यासाठी गेलो तेव्हा मी विरोधही केला नाही, असेही भट यांनी सांगितले.
‘ख्वाबों का सफर’ मालिकेच्या माध्यमातून
पूर्वसुरींना अभिवादन करण्याची संधी
‘स्वप्न तीच असतात. केवळ स्वप्न पाहणारे बदलत असतात,’ हे चित्रपटसृष्टीविषयीचे सत्य सांगत महेश भट यांनी ‘ख्वाबों का सफर’ या मालिकेद्वारे पूर्वसुरींना अभिवादन करण्याची संधी लाभली असल्याचे सांगितले. चित्रपटांच्या निर्माणामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे राजकमल कला मंदिर, आर. के. स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ, न्यू थिएटर्स हे स्टुडिओ या स्टुडिओने घडविलेल्या महान कलाकृती आणि कलाकार या विषयीची माहिती देणाऱ्या या मालिकेचे महेश भट हे निवेदक आहेत. या वेळी भट आणि मधुरा जसराज यांनी राजकमल स्टुडिओ आणि व्ही. शांताराम यांच्या आठवणींना उजाळा दिला.