शाहरुखच्या ‘रईस’मधून माहिरा खानची हकालपट्टी?

सूत्रांच्या माहितीनुसार नव्या नायिकेचा शोध सुरू

शाहरुख खान, माहिरा खान

भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण सध्या तणवग्रस्त झाले आहे. उरी दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन केलेले सर्जिकल स्ट्राईक यांमुळे या दोन्ही देशातील राजकारण आणि इतर क्षेत्रावरही या घटनांचे पडसाद उमटले. त्यापैकी सर्वात जास्त परिणाम पाहायला मिळाले ते म्हणजे चित्रपटसृष्टीवर. मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्याचा दिलेला इशारा आणि त्यांनतर ‘इम्पा’नेही त्यांच्या ७७ व्या सर्वसाधारण बैठकीमध्ये पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी घातली होती. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटातूनही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची गच्छंती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार निर्माता रितेश सिदवानीने हा निर्णय घेतला आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान वाढता तणाव पाहता गेले काही दिवस या चित्रपट निर्मात्यांना माहिराला चित्रपटातून काढून टाकण्याविषयी वारंवार विचारले जात होते. पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता चित्रपटांच्या चित्रीकरणामध्येही अनेक अडथळे येत होते. त्यावर उपाय म्हणून अनेकांनी निर्मात्यांना भारताबाहेर चित्रीकरण करण्याचे सल्लेही दिले होते. पण, हे काही कारणास्तव शक्य नसल्यामुळे माहिराची ‘रईस’मधून गच्छंती करण्यात आली आहे.

माहिरा या चित्रपटातून झळकणार की नाही याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तुर्तास सूत्रांच्या माहितीनुसार माहिराची ‘रईस’ या चित्रपटातून गच्छंती झाल्याच्या चर्चांना बॉलिवूड विश्वामध्ये उधाण आले आहे. दोन देशांमध्ये वाढता तणाव पाहता पाकिस्तानी कलाकारांच्या दृश्यांवर कात्री मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अभिनेता फवाद खान याने ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात विराट कोहलीची भूमिका साकारली होती. पण त्याच्यावर चित्रीत करण्यात आलेली दृश्ये या चित्रपटातून वगळण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mahira khan is replaced from raees search of new heroine started