बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलेल्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला आपण याअगोदर केलेल्या भू्मिकेपेक्षा रुपेरी पडद्यावर वेगळे काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी ते एक आव्हान असते. बॉलीवूडमधील अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला आता महाभारतातील ‘द्रौपदी’ ही भूमिका साकारायची आहे. संधी मिळाली तर आपल्याला ‘द्रौपदी’ साकारायला आवडेल, असे तिने स्वत:च जाहीर केले आहे.
बॉलीवूडमध्ये सध्या ‘जीवन चरित्रा’वर आधारित काही चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. संगीतकार भूपेन हजारिका यांच्या जीवनावर चित्रपट तयार होत आहे. मराठी इतिहासातील बाजीराव पेशवा व मस्तानी यांना केंद्रस्थानी ठेवून संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’चे चित्रीकरण सुरू आहे. यात रणबीर सिंग हा ‘बाजीराव’ची भूमिका करतोय. प्रियांका चोप्रा व दीपिका पदुकोण या दोघीही चित्रपटात ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकार करत आहेत. बॉक्सरपटू ‘मेरी कोम’च्या जीवनावर निघालेल्या याच नावाच्या चित्रपटात  प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका केली होती. ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी येऊन गेला.
एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मल्लिका शेरावत हिला ‘चरित्रात्मक’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर कोणती भूमिका करायला आवडेल, असा प्रश्न केला तेव्हा मल्लिकाने त्यावर तात्काळ महाभारतामधील ‘द्रौपदी’ची भूमिका करायला आवडेल, असे उत्तर दिले. ‘द्रौपदी’ ही एक कणखर व्यक्तिमत्त्वाची स्त्री होती. माझ्या मनात तिच्याविषयी आदर आहे. त्यामुळे संधी मिळाली तर मला ‘द्रौपदी’ साकारायला नक्की आवडेल, असेही तिने सांगितले होते.
‘द्रौपदी’ आणि मल्लिका हे वेगळे आणि न पटणारे समीकरण असले तरी भविष्यात जर मल्लिकाला ‘द्रौपदी’ साकारायला मिळाली तर ती कशी असेल आणि दिसेल, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आणि बॉलीवूडच्या प्रेक्षकांनाही आहे.