सध्या बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत चर्चेत आहे. ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नकाब’ या सीरिजमध्ये दिसली होती. या वेब सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिल्यामुळे या चर्चा रंगल्या होत्या. आता एका मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे. इतकच नाही तर आणखी काही गोष्टींचा देखील खुलासा केला आहे.

२००३मध्ये ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून मल्लिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने १७ किसिंग सीन्स दिले. त्यानंतर तिने ‘मर्डर’ या चित्रपटात काही बोल्ड सीन्स दिले. पण बोल्ड सीन्समुळे तिच्यावर नेहमी टीका झाली. केवळ प्रेक्षकच नाही तर मीडिया आणि तिचे को-स्टार्सही तिच्या विषयी चुकीच्या पद्धतीने विचार करु लागले होते.

मल्लिकाने नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, ‘स्टारडम माझ्यासाठी खूप सोपे होते. मी खूप भाग्यवान होते आणि माझ्याबाबतीत अनेक गोष्टी सहज होत गेल्या. मी मुंबईत आले. मला ख्वाहिश आणि मर्डर चित्रपटाची ऑफर मिळाली. मला जास्त संघर्ष करावा लागला नाही. पण चित्रपटांनंतर इंडस्ट्रीमध्ये मला बोल्ड अभिनेत्री म्हणून सगळे ओळखू लागले. कारण मर्डरमध्ये मी थोडी बोल्ड भूमिका साकराली होती’ असे मल्लिका म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘अनेक अभिनेत्यांनी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मी ऑनस्क्रीन बोल्ड होऊ शकते तर ऑफस्क्रीन का नाही? असे त्यांचे म्हणणे होते. अनेक वेळा अभिनेत्यांना मला माफ करा, मी तडजोड करणार नाही असे सांगावे लागले होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.’