गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची जोरदार चर्चा कलाविश्वात पाहायला मिळत आहे. अफलातून स्टंट्स, कथानक, लोकप्रिय कलाकार आणि भव्य सेट या साऱ्याच्या बळावर दाक्षिणात्य चित्रपटांना विविधभाषी प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. फक्त तेलुगू आणि तामिळच नव्हे, तर मल्याळम चित्रपटांकडेही प्रेक्षकांचा कल पाहायला मिळत आहे. एकंदरच चित्रपटांसाठी पूरक असणारं हे वातावरण पाहता रिमेकचा ट्रेंडही चित्रपटसृष्टीत चांगलाच स्थिरावू लागला आहे. यामध्येच आता आणखी एका चित्रपटाच्या नावाचा समावेश होणार आहे. तो चित्रपट म्हणजे, ‘मायानाधी’.
पद्मराजन आणि इतरही सुपरहिट चित्रपटांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या या चित्रपटाता रिमेक सादर करण्यासाठी ‘लव यू सोनियो’चा दिग्दर्शक जो राजन याने पुढाकार घेतला आहे. मायानाधी चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी भेटलेल्या या टीमने साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली. यावेळी ‘मायानाधी’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या टोविनो थॉमसचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
वाचा : गर्ल गॅंगसोबत किंवा एकटीने फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? या डेस्टीनेशन्सचा नक्की विचार करा
‘मायानाधी’च्या रिमेकशी मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांचंही नाव जोडण्यात येत असून, या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत पिळगावकर आणि जो. राजन यांचीही उपस्थिती होती. मल्याळम ‘मायानाधी’चे निर्माते संतोष कुर्विल्ला आणि आशिक अबु हिंदी रिमेकची ही निर्मिती करणार आहेत तर त्यांच्या जोडीला हिंदी रिमेकसाठी निर्माते म्हणून सचिन पिळगांवकर पुढे सरसावले आहेत. या चित्रपटाच्या पटकथेची उत्कंठावर्धक बांधणी, टोविनो थॉमस आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्यातील फ्रेशनेस या सगळ्यांचीच हिंदीत होणारी मांडणी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.