दबंग सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस १०’ चे पर्व आता अंतिम टप्प्यात पोहचले आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान मनवीरने मिळविला आहे. मोनाच्या गाण्याने घरातील वातावरण नेहमी प्रमाणे सुरु झाले. ‘झुमका गिरा रे..’ या गाण्याच्या तालावर ठुमकत मोनाने दिवसाची सुरुवात केली. लोपाने बिग बॉसचा आदेश वाचून दाखविला. त्यानंतर बानी मनू पंजाबी आणि मनवीर यांनी टास्क सुरु केले होते. मात्र मनूच्या हरकतीने बानी या टास्कमधून बाद झाली. एकमेकांना धक्का न देण्याचे ठरले असताना मनूने तिला धक्का दिला. बानीवर विश्वास नसल्यामुळे मी बानीला धक्का दिला. असे सांगत मनूने मनवीरला अधिक पसंती देखील दर्शविली होती.

मनोज कुमार बैसोया म्हणजेच मनवीर गुर्जर हा दुग्धव्यावसायिक आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत सध्या तो सर्वापेक्षा वरचढ असल्याचे दिसून येते. नाकाच्या शेंड्यावर राग असणारा हा ‘देसी मुंडा’ मनवीर मुळचा नोएडाचा आहे. गुर्जर समाजसुधारणेसाठीच्या कामात हातभार लावणाऱ्यांमध्ये मनवीरचे नाव घेतले जाते. नोएडामध्ये तो अनेक सभा आणि मोर्चांमध्ये सक्रिय असतो. समाजहिताची कामे करण्याव्यतिरिक्त मनवीर त्याचा व्यवसाय आणि त्याच्या नावे असणारी एक डेअरी चालवतो.

जनमताच्या आधारावर अखेर सामान्य वर्गवारीतून बिग बॉसच्या घरात वर्णी लागलेल्या मनवीर गुर्जर अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला स्पर्धक ठरला आहे.  १६ आक्टोबर पासून सुरु झालेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती अशा दोन वर्गवारीतून स्पर्धक सहभागी झाले होते. सेलिब्रेटीसारखी सामान्य स्पर्धकालाही लोकप्रियता मिळू शकते हे मनवीरने शेवटच्या टप्प्यात दाखवून दिले. जनमताच्या आधारावर मनु पेक्षा तीन अधिक मते मिळवून मनवीरने अंतिम फेरीचे तिकिट मिळविले. मनूला १३२ मते मिळाली तर मनवीरला १३५ मते प्राप्त झाली. बिग बॉसचे १० वे पर्व २८ जानेवारी २०१७ ला संपणार आहे. मनवीरने अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर आता मनू, लोपमुद्रा, मोनालिसा, बानी , रोबन आणि नितिभा हे सात स्पर्धक उरले आहेत.

बिग बॉसच्या आदेशानुसार, मनु आणि मनवीर यांना मॉलमध्ये नेण्यात आले होते.  या ठिकाणी दोघांनी मते मागायची होती. अधिक मते मिळविणाऱ्या स्पर्धकास अंतिम फेरीचे तिकिट दिले जाणार होते. या ठिकाणी मनवीरला अधिक पसंती मिळाली.