‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून एक असा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्यामुळे बऱ्याच आठवणींना उजाळा दिला गेला. हा चेहरा म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचा. अभिनय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं वृत्त समोर आल्यापासूनच त्याच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. त्यातही सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’मधून त्याच्या कलेला मिळालेली दाद पाहता या कलाविश्वात अभिनयने पदार्पणातच आपली छाप सोडली असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटानंतर पुढे तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबतचे तर्क लावले जात असतानाच, तो सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात काम करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा घरोबा आता नव्या पिढीच्या साथीने पुढे जात आहे असंच म्हणावं लागेल. सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अभिनय फारच उत्सुक असून, ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना त्याने ही उत्सुकता व्यक्त केली. ‘सध्या आगामी चित्रपटाच्या सुरु असणाऱ्या चर्चा आणि त्यातही सचिन पिळगावकर या मोठ्या व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळण्याचा आनंदच आहे. पण, तरीही काही प्रमाणात माझ्या मनात धाकधुकही आहे’, असं अभिनय म्हणाला. ‘ती सध्या काय करते’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सचिन यांच्या ‘अशी ही आशिकी’ चित्रपटासाठी विचारण्यात आलं. मुख्य म्हणजे आपल्या मित्राचा मुलगा आहे म्हणून किंवा फार चांगली ओळख आहे म्हणून आपल्याला हा चित्रपट मिळाला नसून, सचिन सरांना माझं काम आवडल्यामुळेच त्यांनी या चित्रपटासाठी माझी निवड केल्याचं त्याने सांगितलं.




वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?
‘अनेक दशकं चित्रपटसृष्टीत आपलं योगदान दिलेल्या सचिन पिळगावकर यांच्याकडून मला बरंच काही शिकण्याची संधी मिळणार आहे. त्यातही अनेकांच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असल्यामुळे मी चित्रपट निवडीच्या बाबतीतही काळजी घेतोय. कारण, मला कोणालाही निराश करायचं नाहीये’, असं अभिनय म्हणाला. या वर्षअखेरीस त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
अभिनय क्षेत्रात आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या मुलाचं पदार्पण झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहेच. पण, अभिनय क्षेत्रातच पूर्णवेळ करिअर करण्याचा मनसुबा नसून एकंदर चित्रपटसृष्टीत करिअर करण्याकडे आणि बरंच काही शिकण्याकडे त्याचा कल आहे.
अभिनयासोबतच त्याचा दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी या तांत्रिक बाबींमध्येही रस असल्याचं त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत सचिन पिळगावकर यांच्या मुलीची म्हणजेच श्रिया पिळगावकरचीही बरीच मदत होते असंही त्याने सांगितलं. त्यामुळे या कलाकार कुटुंबाचं अफलातून नातं फक्त स्क्रीनपुरताच सीमित न राहता खासगी आयुष्यातही त्यांचे बंध अतूट आहेत असंच म्हणावं लागेल.