Big Boss Marathi. दर दिवसाआड ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. दिवसाची सुरुवात होण्यापासून ते अगदी तो दिवस मावळेपर्यंत प्रत्येक क्षणाला या घरात सेलिब्रिटींमध्ये खटके उडत आहेत, कोणाची मैत्री होत आहे तर कोणाचे रागरुसवे साऱ्या जगासमोर येत आहेत. अशा या घरातील मंडळी सध्या एका वेगळ्याच वळणावर आले असून, त्यांच्यासाठी आता एक खास पाहुणा या घरात येणार आहे. मुख्य म्हणजे याला पाहुणा म्हणता येणार नाही. कारण, आधीसुद्धा तो या घरात येऊन गेला होता.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणाऱ्या या नव्या सदस्याचं नाव आहे राजेश श्रंगारपुरे. वाइल्डकार्ड एंट्री म्हणून तो या घरात पुन्हा प्रवेश करणार असून, लवकरच या भाग प्रसारित करण्यात येणार आहे. मराठी कलाकारांच्या या अनोख्या अशा कुटुंबासाठी राजेश नवीन नाही. त्यातही रेशमसोबत असणाऱ्या त्याच्या समीकरणाबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

जवळपास महिनाभराच्या आतच राजेशला पुन्हा या घरात प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आता त्याचा हा मुक्काम पुढचे किती दिवस असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, वाइल्डकार्ड एंट्री म्हणून यापूर्वी याआधी हर्षदा खानविलकर, शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले, त्यागराज खाडिलकर या सेलिब्रिटींचाही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश झाला होता. या कलाकारांपैकी हर्षदा ही अवघे काही दिवसच या घरात मुक्कामाला होती. तर, शर्मिष्ठा, नंदकिशोर आणि त्यागराज मात्र या घरात जास्त काळ तग धरु शकले. असं असलं तरीही घरातून बाहेर झालेल्या एखाद्या स्पर्धकाची वाइल्डकार्डद्वारे ही अशी एंट्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे आता हा खेळ आणखी किती रंगतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.