आज ७० वा प्रजासत्ताक दिन असल्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्ती हा दिवस उत्साहात साजरा करत आहेत. मराठी कलाकारांनीही या दिवसाचं महत्व लक्षात घेत हा दिवस साजरा केला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संदीप कुलकर्णीनेही तिरंग्याला अभिवादन करुन दिवसाची सुरुवात केली. संदीपने डोंबिवली रेल्वे स्थानकावर ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी त्याने डोंबिवलीविषयीच्या त्याच्या भावनाही व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीपचा ‘डोंबिवली रिटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटामध्ये संदीपने अनंत वेलणकरही भूमिका वठवली आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आज २६ जानेवारीच्या निमित्ताने डोंबिवली स्थानकात ध्वजारोहण केलं. यावेळी चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, निर्माते महेंद्र अटोले, डोंबिवली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर, सहायक स्टेशन मास्तर, रेल्वे प्रवाशी संघटना, जनरल रेल्वे पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि प्रवासीही उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण झाल्यानंतर संदीपने डोंबिवलीविषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या.

‘नियतीच्या मनात जे असं तेच होतं. तिच्या मनात असतं तशाच गोष्टी होतात आणि आपोआप योग जुळले जातात. तसाच हा आजचा योग जुळून आला आहे. माझं डोंबिवलीशी खास नातं आहे. सिनेमाच्या निमित्ताने डोंबिवलीशी माझा जवळचा संबंध आहे. माझे मित्र नातेवाईक ही डोंबिवलीमध्ये राहतात. असं कधी वाटलं नव्हतं कि माझ्या कलाकृतीच्या निमित्ताने मी डोंबिवलीचा एवढा मोठा भाग होईन, असं संदीप म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘डोंबिवली हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आजचा हा दिवस अभिमान, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. प्रवाशांना विविध सेवा देताना आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांसोबत हा दिवस साजरा करावासा वाटला यासाठी मी इकडे आलो’.

‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटात संदीप कुलकर्णी यांनी सर्वसामान्य नोकरदाराची भूमिका केली आहे. हा अनंत वेलणकर लोकलमधून धक्के खात रोज प्रवास करत असतो. त्याच्या आयुष्यातल्या एका घटनेमुळे काय घडतं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. करंबोला क्रिएशन्सची निर्मिती असलेला, महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sandeep kulkarni republic day celebrate at dombivali station
First published on: 26-01-2019 at 12:58 IST