मराठी रंगभूमीवर आजवर अनेक नाटकं आली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली. अशा या नाटकांच्या आणि कलाकारांच्या गर्दीत आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या अभिनेत्याने अकाली एक्झिट घेतली. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली.

आपल्या हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होतीच. पण, त्यासोबतच काही अफलातून भूमिका रंगवत त्यांनी एक कलाकार म्हणूनही रंगभूमीवर मोलाचं योगदान दिलं. अशाच त्यांच्या भूमिकांमधील एक नाव म्हणजे ‘मोरुची मावशी’.

विजय चव्हाण आणि ‘मोरुची मावशी’ हे म्हणजे एक वेगळंच आणि समजण्यापलीकडलं समीकरण. विविध कार्यक्रम म्हणू नका किंवा मग एखादी मुलाखत. विजय चव्हाण यांच्याकडून या ‘मावशी’ची एक झलक पाहण्यासाठी अनेकांमध्येच उत्सुकता असायची. ज्या नजाकतीने आणि प्रभावीपणे त्यांनी स्त्री पात्र रंगभूमीवर साकारलं होतं, ते पाहता या कलाकाराची कामाप्रती असणारी निष्ठाच प्रकाशझोतात येत होती. त्यांच्या याच नाटकातील ‘टांग टिंग टिंगाक्’ या गाण्याची छोटीशी झलक पाहताना याचा अंदाज येतो.

‘आण्णां’च्या जाण्यानं ‘दामू’ही गहिवरला, म्हणाला….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्यूबवर या गाण्याचा काही मिनिटांचा व्हिडिओ उपलब्ध असून, तो पाहताना विजूमामा यांनी साकारलेली ‘मावशी’ सर्वांचच मन जिंकून जाते. एखादं स्त्री पात्र मोठ्या प्रभावीपणे साकारत अदा आणि नजाकती जपणं, हे आव्हान जणू त्यांनी लिलया पेललं होतं. त्यामुळे काळ आणि कलासृष्टी कितीही पुढे गेली, तरीही या ‘मोरुच्या मावशी’ला विसरणं निव्वळ अशक्यच आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.