हल्ली बरेच कलाकार सोशल मीडियावर बिनधास्तपणे आपली मतं मांडत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. अभिनेत्री रेणुका शहाणे चालू घडामोडी, राजकीय प्रसंग आणि इतर मुद्द्यांवर परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून त्या बेधडकपणे आपली मतं मांडतात. त्यासोबतच वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही देतात.

सध्या मराठी टेलिव्हिजन विश्वात बिग बॉसचे दुसरे पर्व चांगलेच गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या या कार्यक्रमाचा प्रवास चांगल्याचं रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे.  यातील कलाकारांना कधी प्रेक्षकांकडून ट्रोल केलं जातं तर कधी त्यांचं कौतुकही केलं जातं. या स्पर्धेत अभिनेत्री किशोरी शहाणेही सहभागी झाल्या आहेत. पण, सध्या रेणुका शहाणेंना अनेकजण किशोरी शहाणे म्हणून ट्विटरवर टॅग करत आहेत. नुकतंच यासंबंधी रेणुका शहाणे यांनी ट्विट केले आहे.

‘मी किशोरी शहाणे नाही,बिग बाॅस मध्ये नाही, माझा ह्या कशाशीच काहीही संबंध नाही! कृपया मला टॅग करू नका. समाज माध्यमांचा गैरवापर टाळा. आणि कृपया विचार करा.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. एका नेटकऱ्याने बिग बॉसमध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीवर ट्विट केले होते त्यावर, ‘बिग बाॅस मध्ये जाणाऱ्या लोकांकडून शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार, ही अपेक्षा करणं त्या कार्यक्रमाच्या रूपरेखेशी सुसंगत आहे का?’ असं रेणुका शहाणे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघींचे आडनाव सारखे असल्याने सारासार विचार न करता लोक चक्क रेणुका शहाणेंनाच किशोरी शहाणे समजू लागले आहेत. नावातील फरक लक्षात आणून देणारे एक ट्विटही रेणुका शहाणेंनी केले आहे. ‘चक्क हॅशटॅग shameonrenukaandparag चालवता? किशोरी आणि रेणुका मध्ये काहीच अंतर दिसत नाही का तुम्हाला? बघा नं! तिचं नाव “कि” नी सुरू होतं तर माझ्या नावाचा शेवट “का” नी होतो! तिच्या नावाचा शेवट “री” नी होतो आणि माझ्या नावाची सुरूवात “रे” नी होते. बघा!जमलं तर फरक शोधा, खूप सापडतील.’ असं त्यांनी लिहिलं आहे.