छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉसने आपली ओळख मराठी कलाविश्वातही निर्माण केली. काही दिवसापूर्वी मराठी बिग बॉसचं पहिलं पर्व पार पडलं. या पर्वात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी सहभाग घेतला होता. या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते या दोन स्पर्धकांनी प्रेक्षकांचं विशेष मनोरंजन केलं. घरात कायम तू तू-मैं मैं करणाऱ्या जोडीचं एकमेकांशी कधीच पटलं नाही. इतकंच नाही तर शो संपल्यानंतरही हे दोघं संधी मिळाली की एकमेकांविषयीचा राग व्यक्त करत असतात.
घरात सतत उषा नाडकर्णींसोबत वाद घालणारे अनिल थत्ते यांनी उषा यांना बहीण मानलं आहे. या नात्याने यंदाच्या भाऊबीज ते उषा नाडकर्णी यांच्या घरी जाऊन सेलिब्रेट करणार असल्याचं वारंवार म्हणतं होते. मात्र अचानक त्यांनी त्यांचा निर्णय बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
‘उषा नाडकर्णी या माझ्या मानलेल्या बहीण आहेत. त्यामुळे आमच्या बहीण-भावाच्या नात्याचा कुठे अवमान होईल किंवा अधिक्षेप होईल असं मी कधी वागत नाही. या नात्याचा आदर राखत मी त्यांचादेखील मान राखतो. त्यामुळे यंदा भाऊबिजेला त्यांच्या घरी जाण्याची माझी प्रचंड इच्छा होती. परंतु आता मी हा निर्णय बदलला आहे’, असं अनिल थत्ते म्हणाले.
पुढे ते असंही म्हणाले, ‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून उषाताई माझा केवळ अपमान करत आल्या आहेत. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी माझा उल्लेख करताना अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे आता मी मानत असलेलं हे नात एकतर्फी आणि निरर्थक आहे. त्यामुळे भाऊबीजेला त्यांच्या घरी जाऊन मला माझा अपमान करुन घ्यायचा नाही’.
दरम्यान, अनिल थत्ते यांनी यंदा भाऊबीजेसाठी उषा नाडकर्णी यांच्याकडे जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता थत्तेंच्या या वक्तव्यावर उषा नाडकर्णी काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.