मराठी चित्रपटांना डावलणाऱ्या चित्रपटगृहांवर सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी विचारला आहे. येत्या २२ तारखेला अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी मराठीतही ‘देवा’ आणि ‘गच्ची’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, या दोन्ही चित्रपटांना सलमानच्या चित्रपटाच्या तुलनेत मिळणाऱ्या प्राइम टाइम शोची संख्या कमी असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये राजकीय संघटनांनी उडी घेतल्याने वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी ट्विट करून आपले मत व्यक्त केले.

राज्य सरकारने मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मल्टिप्लेक्सना नियम आखून दिले आहेत. मग चित्रपटगृहांचे मालक या नियमांचे पालन का करत नाहीत? सरकारही त्यांच्यावर योग्य ती कारवाई का करत नाही?, असे सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केले. त्यामुळे आता सरकार याविषयी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वाचा : कोकण पर्यटनास प्रोत्साहन देतोय ‘देवा’

सलमान खानची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘टायगर जिंदा है’ आणि अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘देवा…’ या दोन्ही चित्रपटांच्या वाट्याला आलेल्या प्राइम टाइम शोमध्ये तफावत आढळल्यामुळेच या वादाला तोंड फुटले आहे. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो मिळवण्यासाठी अनेकदा झगडावे लागते, हाच मुद्दा पुन्हा एकदा नेतेमंडळींनीही उचलून धरला. मनसेच्या शालिनी शाकरे, काँग्रेसचे नितेश राणे आणि शिवसेनेचे संजय राऊत या बड्या नेतेमंडळींही याविषयी आपले मत मांडत मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात त्यांच्या हक्काची चित्रपटगृह आणि प्राइम टाइम शो उपलब्ध झालेच पाहिजेत, असे ठाम मत मांडले आहे.

नितेश राणेंशी आपल्याच शैलीत ट्विट करत, “महाराष्ट्रात ‘देवा’ला मारुन ‘टायगर..’ जिवंत राहत असेल तर त्या थिएटर्सना कुठलाच ‘टायगर’ वाचवू शकणार नाही”, असे ट्विट केले. तर संजय राऊत यांनीही फक्त ‘देवा’च नव्हे तर प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायलाच हवे, असे म्हटले, त्यामुळे सद्यपरिस्थिती पाहता येत्या काळात चित्रपटगृहांचा हा मुद्दा बराच चर्चेत येणार असे म्हणायला हरकत नाही.