यंदा सण इतक्या पटापट आल्यामुळे गृहिणींची चांगलीच धांदल उडतेय. त्यातही दिवाळीच्या फराळासाठीची लगबग, तो नीट होतोय की नाही यासाठी जीवाला लागून राहिलेली हुरहूर या साऱ्या गोष्टी सध्या घराघरात पाहायला मिळत आहेत. अशा या सणाच्या शुभमुहूर्तावर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ काही पाककृती तुमच्या भेटीला आणत आहे. या पाककृती तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींनी सांगितल्या आहेत. या सेलिब्रिटींमध्ये आता युवा अभिनेता सुयश टिळकचाही समावेश झाला आहे. सुयश हा एक उत्तम अभिनेता आहेच पण त्याचसोबत तो खूप चांगला खवैय्याही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या तो एका वेब शो मध्ये व्यग्र आहे. पण, त्यातूही वेळ काढत त्याने आपल्या आवडत्या पदार्थाची रेसिपी ‘लोकसत्ता ऑनलाइन’सोबत शेअर केली. या वेब शोमध्येच त्याला हा पदार्थ कसा बनवतात याची माहिती मिळाली आणि तो पदार्थ त्याचा आवडीचा पदार्थ होऊन गेला. दिवाळीच्या या धामधुमीत गोडाधोडाचं खाऊन आणि त्याच त्याच पदार्थांची चव चाखून झाल्यानंतर जर कंटाळा आला, तर मग सुयशचा हा पदार्थ तुमच्यासाठी पर्वणीच ठरेल. ‘ट्विस्ट इट’ या वेब शोमध्ये सुयश हा पदार्थ शिकला. तो पदार्थ शिकण्यात त्याला मदत मिळाली ती म्हणजे शेफ प्रदीप भवाळकर यांची. शेफकडून शिकलेल्या या अनोख्या पदार्थाचं नाव आहे ‘कांद्याच्या करंज्या’. ‘रिव्हर्ब कट्टा’ या युट्यब चॅनलवर या पदार्थाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, दिवाळीला हलकासा ट्विस्ट देण्याऱ्या या करंज्या सध्या अनेकांच्या जीभेचे चोचले पुरवत आहेत.

वाचा : तेजस्विनी, संजय, उमेश, सिद्धार्थच्या ‘ये रे ये रे पैसा’चे हटके पोस्टर फोटोशूट!

काय म्हणता… तुम्हालाही करुन पाहायचाय हा पदार्थ? चला तर मग थेट वळूया कांद्याच्या करंज्या बनवण्याच्या कृतीकडे.
त्यासाठी लागणारं साहित्य..

मैदा
बटर
ओला नारळ (किसलेला)
कांदा (किसलेला)
मीठ
मिरची (बारीक चिरलेली)
कोथिंबीर (बारीक चिरलेली)
तेल (करंज्या तळण्यासाठी)

वाचा : ऐन दिवाळीत शाहिदची ‘बत्ती गुल…’

कृती-
कांदा बारीक किसून त्यात मीठ घालून एका कापडात तो बांधून ठेवावा. जेणेकरुन त्यातील सर्व पाणी निघून जाईल.

करंजीचं आवरण करण्यासाठी, साधारण ३०० ग्राम मैदा आणि त्यामध्ये ४० ग्राम बटर घ्या. हे प्रमाण अंदाजे ठेवलं तरीही चालतं. बटर आणि मैदा हे पदार्थ एकजीव केल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यावं. हे पीठ २० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा.

२० मिनिटांनंतर पीठ फ्रिजमधून काढून त्याचे लहान लहान गोळे करुन घ्यावेत. साधारण पूरी लाटतो त्याप्रमाणे या गोळ्यांच्या लहान पुऱ्या करुन लाटाव्यात.

सारणाची कृती-
एका भांड्यात मीठ लावून, पाणी काढून घेतलेला कांदा, मिरची, किसलेला ओला नारळ, कोथिंबीर हे सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावं.
मैद्याच्या पोळ्यांच्या कडांना पाणी लावावं, जेणेकरुन सारण त्यातून बाहेर येणार नाही. त्यानंतर या पोळ्यांमध्ये कांदा, खोबऱ्याचं सारण भरावं.

एका गॅसवर तेल गरम करून, त्या तेलात या करंज्या तळून घ्यावात. सोनेरी रंगाच्या होईपर्यंत या करंज्या तळून घ्याव्यात आणि चटणीसोबत सर्व्ह करा, कांद्याची करंजी.

सायली पाटील, sayali.patil@indianexpress.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi celebrity actor suyash tilak shared his favourite food item recipe how to make onion karanji
First published on: 20-10-2017 at 10:39 IST