‘मडगाव एक्स्प्रेस’ची कंचन कोमडी असो किंवा ‘लापता लेडीज’ मधील मंजू माई…ज्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने संपूर्ण कलाविश्वात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं, अशा मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांचं नाव आज देशभरात अभिमानाने घेतलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून छाया कदम त्यांच्या ‘कान्स’वारीमुळे चर्चेत आहेत. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला कान्स सोहळ्यात मोठं यश मिळालं आहे.

७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात दोन दिवसांपूर्वी पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं होतं. यानंतर या चित्रपटाची संपूर्ण टीम भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आता या चित्रपटाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ३० वर्षांनंतर ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाने कान्समध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावला आहे. कान्समध्ये हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. या पुरस्कारवर भारतीय सिनेमाने आपलं नाव कोरल्याने सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा…”, वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशने वाहिली आदरांजली

अभिनेत्री छाया कदम यांनी नाटकापासून त्यांचा हा कलाविश्वातील प्रवास सुरू केला होता. त्यानंतर हळुहळू त्यांनी मराठीसह काही दमदार हिंदी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. आज ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ने पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांनी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री म्हणतात, “आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाट्याला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक – एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची – लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच, एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहचला आहे.”

हेही वाचा : “नाटक, अभिनय तुझ्यासाठी नाही…”, पुरस्कार जिंकल्यावर अक्षया नाईकची भावुक पोस्ट; म्हणाली, “गेले ४८ तास…”

“माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार…की, तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहोचली आहे. खूप समाधान – आनंद आणि मन भरून आलं” अशी पोस्ट शेअर करत छाया कदम यांनी त्यांच्या तमाम चाहत्यांसह कलाकार मित्रमंडळींचे आभार मानले आहेत.