अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. सध्या तो त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. नुकताच त्याने त्याच्या तुकाराम या हिंदी चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्याचा ‘फुलराणी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशन दरम्यान त्याने खऱ्या आयुष्यातील फुलराणीचा उल्लेख केला आहे.
पुलंच्या ‘ती फुलराणी’ नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर प्रमुख भूमिकेत आहेत. या निमित्ताने सुबोध रिमोट मराठीशी संवाद साधताना खऱ्या आयुष्यातील फुलराणीबद्दल बोलला आहे. तो असं म्हणाला, “माझ्या आयुष्यात एक फुलराणी होती जिला मी कधीच विसरू शकत नाही. ती म्हणजे ‘स्मिता तळवलकर’, मला तिने घडवलं आहे. ती माझी आईची होती.”
“मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो, ती हास्यजत्रेत…” सुबोध भावेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
तो पुढे म्हणाला “माझ्याकडे काहीच काम नसताना मला एक, दोन प्रोजेक्टमधून काढून टाकलं मी तिच्या कुशीत जाऊन रडलो. तेव्हा तिने मला सांगितले की स्मिता तळवलकर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्याकडे काम नाही असं होणार नाही. म्हणून मला तिने कायम काम दिलं असं नाही पण ती माझा कणा म्हणून पाठीमागे उभी होती.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
स्मिता तळवलकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री व वृत्तनिवेदिका होत्या. तसेच त्या निर्मिती क्षेत्रात कार्यरत होत्या. ‘अस्मिता चित्र’ या त्यांच्या निर्मिती संस्थेने ‘अवंतिका’, ‘सातच्या आत घरात’ अशा दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि ७ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.