बहुप्रतिक्षित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काळसर रंगाचे रंगवलेले रौद्र रूप, लालसर डोळे आणि विलक्षण कटाक्ष, या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणारी याची उत्कंठा अधिकच वाढते आहे.
सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. हे दिलीप प्रभावळकरच आहेत का? असा प्रश्न पडतो आहे आणि ते नेमके या रुपात काय करणार आहेत याचे कुतूहल निर्माण करत आहे.
सध्या केवळ चेहऱ्याची एक झलक समोर आली असून त्यामागचं खरं रूप, त्याचा संदर्भ आणि कथा अजूनही गूढतेच्या पडद्यात दडलेली आहे.
पोस्टर वरुन दिलीप प्रभावळकर यांची ही वेगळीच भूमिका असणार, याचा अंदाज येतोय पण नेमकी ही भूमिका काय असेल याची उत्कंठा आता अधिकाधिक वाढतेय. अर्थातच हे रहस्य १२ सप्टेंबरला रुपेरी पडद्यावरच उलगडेल.
पाहा पोस्टर –

कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे. कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग ५० दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असल्यामुळे कोकणच्या भव्यतेचा अनुभव रसिकप्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘दशावतार’ चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत.