प्रेमपट आणि लेखक-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचं अतूट नातं आहे. प्रत्येक काळात बदलत गेलेली पिढी आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्या मनात उमलणारी प्रेमाची भावना, कधीकधी आर्थिक-सामाजिक परिस्थितीच्या ओझ्याखाली दडपलेलं, त्यातूनही आपली वाट काढत नात्यांना घट्ट बांधून घेणारं प्रेम… असे प्रेमाचे कैक रंग आजवर सतीश राजवाडेंच्या चित्रपटांतून आपण अनुभवलेलं आहे.
‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचं शीर्षक हे आधीच्या त्यांच्या चित्रपटातील विषयाशी नाळ कुठेतरी जोडली गेल्याचं सूचित करणारं आहे. खरंतर, ही प्रेमात पडण्याची, त्यातली नवी नवलाई संपल्यावर येणाऱ्या खाचखळग्यांमध्ये ठेचकाळून जखमी झाल्यानंतरही पुन्हा एकदा प्रेम सावरून घेण्याची, प्रगल्भ प्रेमाच्या आतून येणाऱ्या जाणिवेची गोष्ट आहे. आणि थोडं स्पष्ट शब्दांत सांगायचं तर प्रेमात पडण्याची दुसरी संधी मिळाली तर काय? याची हलकीफुलकी गोष्ट आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं होतं, मात्र त्यावेळी घटस्फोटासाठी न्यायालयात आलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींची पहिल्यांदा झालेली भेट आणि त्यानंतर एकमेकांना समजून घेत त्यांच्यात आकारत गेलेली प्रेमाची अतिशय तरल, भावगर्भ आणि अधिक प्रगल्भ अशी गोष्ट लेखक-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी रंगवली होती. मधल्या वीस वर्षांच्या काळात घटस्फोटाची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. एकमेकांशी पटलं नाही तर जोडपी लगेच विभक्त होण्याचा निर्णय घेतात.
कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर एकमेकांत फार अडकून न पडता आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणाऱ्यांची संख्या पूर्वीपेक्षा तुलनेने अधिक आहे. मग झटपट प्रेमात पडणं आणि त्यातून तितक्याच वेगाने बाहेर पडणं… यात खरोखरच आपल्या मनातली प्रेमभावना खरी आहे का? आपल्याला जसं हवं आहे अगदी तशीच फुटपट्टी लावून जोडीदार निवडला म्हणजे खरं प्रेम मिळेल असं काही असतं का? हे पडताळून पाहणं, विचार करणं गरजेचंच वाटत नसल्याने असेल कदाचित या गोष्टींसाठी आत्ता लोकांकडे वेळ उरलेला नाही.
अशा परिस्थितीत आयुष्यात कुठल्याच बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेऊ न शकणारा एक तरुण जेव्हा मैत्री, प्रेम, लग्न या सगळ्यातून जाऊन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा राहतो आणि सगळ्या परिस्थितीसाठी देवालाच दोष देऊ लागतो तेव्हा काय चमत्कार होतो? याची गमतीशीर गोष्ट सतीश राजवाडेंच्या नव्या प्रेमपटात पाहायला मिळते.
‘प्रेमाची गोष्ट २’ हा मांडणी आणि विषय दोन्हीच्या दृष्टीने हलकाफुलका चित्रपट आहे. प्रेमाची प्रत्येकाची संकल्पना वेगवेगळी असते. अगदी अनोळखी व्यक्तीशी लग्न कसं करायचं? हा जसा प्रश्न असतो. तसंच एखाद्याशी घट्ट मैत्रीचं नातं असेल तर त्याचं प्रेमात रूपांतर झाल्यानंतरही ते नातं तसंच टिकून राहिल का? हाही प्रश्न असतो. इथे ‘प्रेमाची गोष्ट २’मध्ये अर्जुन आणि मेरी एकमेकांचे शाळासोबती.
लहानपणापासूनची त्यांची मैत्री. विन्या हा या मैत्रीचा तिसरा कोन. या तिघांमध्ये घट्ट मैत्री आहे. मेरी आणि अर्जुन लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. अर्जुन कुठेही नोकरीधंद्यात स्थिर होत नाही, झालेला नाही. अशा अवस्थेत मेरीच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार तो त्यांच्याच कंपनीत कामाला सुरुवात करतो. मात्र, हे जे काही झालं आहे ते सगळंच त्याच्या मनाप्रमाणे झालेलं नाही. त्यातच प्रेमाचे गोडीगुलाबीचे दिवस संपल्यानंतर या दोघांमध्ये उडणारे खटके आणि मग जुन्या कुठल्यातरी ‘प्रेमा’ने आयुष्यात पुन्हा पाऊल टाकल्यानंतर अर्जुनच्या मनात उडालेला गोंधळ… हा सगळा कथाभाग आजच्या कुठल्याही तरुण-तरुणीच्या आयुष्यात सहज घडू शकेल असाच आहे.
मला जे हवं आहे ते मिळतच नाही म्हणून असमाधानी राहणाऱ्या मनाला खऱ्या प्रेमाचीच काय आई-वडील, मित्र कुठल्याच नात्यांमधला उबदारपणा जाणवत नाही. घडणाऱ्या गोष्टींसाठी कायम दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापेक्षा स्वत:च्या मनात एकदा डोकावून पाहायला हवं, याची जाणीव लेखक – दिग्दर्शकाने अर्जुनच्या गोष्टीतून सहजपणे करून दिली आहे.
प्रेमपट हाताळताना अनेक भावभावनांचे छोटे छोटे पदर गुंफत गोष्ट रंगवण्याची राजवाडे यांची हातोटी याही चित्रपटात अनुभवाला येते. अर्थात, इथे एका चमत्कारामुळे नायकाला आपल्या प्रेमाकडे, आयुष्याकडे पाहण्याची दुसरी संधी मिळते. त्यामुळे काल्पनिक गोष्टीचा आधार देत ही प्रेमकथा रंगवण्यात आली असल्याने काही प्रमाणात चित्रपट वास्तवाचा धागा सोडतो. प्रेम ही एक गोष्ट सोडली तरी नायकाची व्यक्तिरेखा, त्याच्या समस्या आणि त्याच्या अवतीभवती असलेल्या लोकांची गोष्ट ही बऱ्यापैकी वरवर आणि उथळ मांडणी असलेली आहे.
शिवाय, दोन दोन नायिका चित्रपटात असतानाही कथा बऱ्यापैकी नायक केंद्रित झालेली आहे. अर्जुनच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेत असलेल्या अभिनेता ललित प्रभाकरने चित्रपट बऱ्यापैकी एकट्याने पेलला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खऱ्या अर्थाने प्रेमपटांचा नायक म्हणून सगळ्या गोष्टी एकाच चित्रपटात करण्याच्या मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं आहे. त्याच्या दिसण्यापासून ते व्हीएफएक्सबरोबर जुळवून घेत केलेल्या अभिनयापर्यंत सगळ्याच गोष्टींवर त्याने घेतलेली मेहनत दिसून येते.
ऋचा वैद्या आणि रिधीमा पंडित या दोघींनीही त्यांच्या भूमिकांना यथोचित न्याय दिला आहे. आबुराव आणि बाबुराव म्हणून स्वप्नील जोशी-भाऊ कदम यांना थोडा आणखी वाव मिळता तर अधिक मजा आली असती. सतीश राजवाडे यांच्या आजवरच्या भावगर्भ प्रेमपटांपेक्षा ‘प्रेमाची गोष्ट २’ ही तुलनेने अधिक हलकीफुलकी आणि रंजकतेकडे झुकणारी आहे.
प्रेमाची गोष्ट २
दिग्दर्शक : सतीश राजवाडे
कलाकार : ललित प्रभाकर, रुचा वैद्या, रिधीमा पंडित, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, प्रसाद बर्वे आणि अविनाश नारकर.
