मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी पूजाच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांनी या लग्नासाठी विशेष तयारी केली होती. अशातच अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकरच्या नखांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

पूजाच्या लग्नसोहळ्यातून परतताना रेड कार्पेटवर सुखदा खांडकेकर आणि अभिजीत खांडकेकर यांनी पोज देत फोटो काढले. दोघांनीही मॅचिंग कपड्यांची निवड केली होती. सुखदा निळ्या आणि लाल रंगाच्या साडीत दिसली; तर अभिजीतने निळ्या रंगाचा कुर्ता आणि लाल रंगाचे धोतर परिधान केले होते.

हेही वाचा… आमिर खानने ‘असा’ घेतला होता दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट; किरण राव म्हणाली, “आम्हाला आझादला…”

सुखदाने पूजा आणि सिद्धेशच्या लग्नासाठी स्पेशल नेलआर्ट केले होते. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सुखदाच्या नखांची प्रशंसा झाल्यावर सुखदा म्हणाली, “आज या नखांवर खूप जण टपून आहेत. एक आम्हाला दे. आम्हीही घालतो, असे म्हणतायत.” त्यावर अभिजीत म्हणाला, “मीच गिफ्ट दिलीत ती. पाच जणांनी असा प्रयत्न केला होता की, आपण एक-एक नख वाटून घेऊ या; जो आम्ही हाणून पाडला होता.”

सुखदाने या नखांचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. “नेलकॅप्स, माझा नवीन आवडता दागिना.” असं कॅप्शन देत सुखदाने हा फोटो शेअर केला आहे. तिच्या नखांची चर्चा सर्वत्र झाल्याने त्याचा एक क्लोजअप फोटोही तिने शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत तिने लिहिले, “सगळ्यांच्या मागणीनुसार या नखांचा मी क्लोज अप फोटो शेअर करत आहे. सोन्याचा थर असलेल्या या चांदीच्या नेलकॅप्स आहेत.”

हेही वाचा… १० वर्षांच्या डेटिंगनंतर तापसी पन्नू बांधणार लग्नगाठ; अभिनेत्री म्हणाली होती, “अत्यंत साधं…”

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाला व रिसेप्शनला वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, प्रार्थना बेहरे, सचिन पिळगांवकर, मृण्मयी देशपांडे, अंकुश चौधरी, पुष्कर जोग, केदार शिंदे, अमोल कोल्हे अशा बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. पूजाने तिच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांसह अनेक कलाकार या नवजोडप्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.