चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची ऊर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ आणि उद्योजिका म्हणून नावाजलेल्या साया दाते यांनाही चित्रपटनिर्मितीची ओढ होती. स्वत: चित्रपटनिर्मितीचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असून एक रिक्षाचालक उत्तम नर्तक म्हणून झालेल्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘टँगो मल्हार’ हा त्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला चित्रपट १९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आले.

‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली असून यात एका रिक्षाचालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या तरुण मल्हारला अचानकपणे ‘टँगो’ या अर्जेटिनाच्या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्य प्रकारामुळे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी रंजकपणे घडत जातात, या कथासूत्रावर ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट बेतला आहे.

चित्रपटाचे लेखन साया दाते, मनीष धर्मानी यांनी केले आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनी आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत केलं आहे. चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ती विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे हे नवोदित कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) येथून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत यूट्यूबमध्ये काम केलं, दहा वर्षं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करून भारतात परतल्यानंतर त्यांनी पुण्यात स्वतःची कंपनी उभी केली.

उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना प्रतिष्ठित फोर्ब्जच्या ‘३० अंडर ३०’ यादीतही स्थान मिळालं होतं. लहानपणापासूनच चित्रपटांविषयी ओढ असलेल्या साया यांनी वयाच्या १२ व्या वर्षी ‘ऑन द अदर लाइन’ हा लघुपट दिग्दर्शित केला होता. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून हा लघुपट गौरवला गेला. साया स्वत: उत्तम टँगो नृत्यांगनाही आहेत. आता या चित्रपटाच्या माध्यमातून त्या निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून स्वत:ला अजमावून पाहात आहेत.