हिंदी मालिका म्हटल्या की डोळ्यासमोर शहा, मेहता, ठाकूर, चौहान या नावाची गुजराती, मारवाडी, सिंधी किंवा पंजाबी कुटुंबे पाहायला मिळतात. मग त्यांचे मोठमोठाले बंगले, महागडे कपडे घातलेले कलाकार, घरासमोरील गाडय़ांच्या रांगा हे सर्व चित्र रंगवलेले आतापर्यंत दिसत आलेले आहे. या सगळ्यात मराठी कुटुंबाची संख्या मात्र हिंदी मालिकांमध्ये तुरळकच आहे. नुकतेच ‘सब टीव्ही’ने त्यांच्या नवीन मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा एक मराठी कुटुंब पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘चंद्रकांत चिपलूणकर सीडी बम्बावाला’ या मालिकेची विशेष बाब म्हणजे, या मालिकेतून पहिल्यांदा मराठी नाटकसृष्टीमधील प्रशांत दामले आणि कविता लाड ही गाजलेली जोडी हिंदी मालिका क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहेत. तसेच मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच टीव्हीवर एका फायरमॅनची कथा सांगितली जाणार आहे. या निमित्ताने हिंदी मालिकांमधील मराठी कुटुंबाच्या वावराबाबत एक उजळणी करू या.
मराठी कुटुंबांभोवती फिरणाऱ्या हिंदी मालिकांची संख्या तशी कमीच आहे. त्यातही त्यापैकी फार कमी मालिका टीव्हीवर गाजलेल्या आहेत. सध्या ‘दामोदर’ कुटुंबाभोवती फिरणारी ‘झी टीव्ही’वरील ‘पवित्र रिश्ता’ ही मराठी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारी दैनंदिन मालिका तब्बल पाच वर्षे लोकांच्या हृदयावर राज्य करीत आहे. याशिवाय ‘स्टार प्लस’वरील ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून ‘अग्निहोत्री’ कुटुंब दाखवले आहे. आता यांच्यामध्ये ‘चंद्रकांत चिपलूणकर सीडी बम्बावाला’ ही मराठी कुटुंब असलेली तिसरी मालिका असेल. यापूर्वी ‘सब टीव्ही’चीच ‘मिसेस तेंडुलकर’, ‘सोनी’ वाहिनीवरील ‘जी ले जरा’, ‘स्टार प्लस’वरील ‘मायके से बंधी डोर’ अशा काही मोजक्याच हिंदी मालिकांमधून मराठी कुटुंबे पाहायला मिळाली आहेत. तसेच ‘कलर्स’ वाहिनीने काही वर्षांपूर्वी ‘वीर शिवाजी’ आणि ‘झी टीव्ही’ने ‘झांसी की रानी’ या दोन मालिकांमधून ‘शिवाजी महाराज’ आणि ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र दाखवण्यात आले होते.
हिंदी मालिकांमध्ये मराठी कुटुंबांची संख्या कमी असली तरी त्यांना कथानकांचे वैविध्य मिळाले हे मात्र नक्की. नव्याने येणाऱ्या ‘चंद्रकांत चिपलूणकर सीडी बम्बावाला’ या मालिकेतून पहिल्यांदाच एका फायरमॅनची कथा सांगितली जाणार आहे. हा फायरमन कोणालाही नाही म्हणू शकत नाही, त्यामुळे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर तो कशी मात करतोय, यावर ही मालिका अवलंबून असणार आहे. याशिवाय ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घरातील स्त्रियांना आपल्या दबावाखाली ठेवणाऱ्या सासऱ्याच्या विरोधात त्याच्या सुनेने दिलेला लढा यावर भर दिला आहे. ‘मिसेस तेंडुलकर’मध्ये बायकोच्या करिअरसाठी घराची जबाबदारी खुशीने सांभाळणाऱ्या लेखक नवऱ्याची कथा सांगितली होती, तर ‘जी ले जरा’मध्ये ३४ वर्षांची नायिका आणि २७ वर्षांचा नायक यांची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. लग्नानंतरही माहेरची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुलीची कथा ‘मायके से बंधी डोर’मध्ये सांगण्यात आली होती.
या मालिकांमधून मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिद्ध चेहऱ्यांनी हिंदी मालिकांमध्येही आपले स्थान भक्कम केले आहे. ‘पवित्र रिश्ता’मुळे अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबतच उषा नाडकर्णी यांनी साकारलेली खाष्ट सासू आणि सविता प्रभुणे सांनी साकारलेली प्रेमळ आईही लोकांमध्ये बरीच प्रसिद्ध झाली होती. प्रिया मराठेचा चेहराही या मालिकेमुळे घराघरांमध्ये ओळखीचा झाला आहे.
‘मायके से बंधी डोर’मध्ये ऐश्वर्या नारकरने साकारलेली आईची भूमिकाही गाजली होती. मिसेस तेंडुलकर या मालिकेतून किशोरी गोडबोले, भरत गणेशपुरे, स्मिता सरवदे हे मराठीमधील चेहरे घराघरांमध्ये पोहोचले होते. ‘चंद्रकांत चिपलूणकर सीडी बम्बावाला’च्या माध्यमातून प्रशांत दामले-कविता लाड ही नाटकांमधून गाजलेली जोडी हिंदी मालिकांमध्ये आपले नशीब अजमावताना दिसणार आहे. यांच्यासोबतच नयना आपटे, श्रीधर फडकेसारखे काही मराठी चेहरे हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहेत.
गुजराती, पंजाबी प्रेक्षकवर्गाप्रमाणे मराठी प्रेक्षकवर्ग हा महाराष्ट्र वगळता भारताच्या इतर भागांमध्ये कमी आहे. तसेच हा प्रेक्षकवर्ग सर्वप्रथम मराठी मालिकांना पसंती देताना दिसतो. त्यामुळे बहुतेक वेळा हिंदी मालिकांमध्ये पंजाबी, गुजराती किंवा मारवाडी कुटुंबे दाखवली जातात. तसेच ही कुटुंबे घेतल्यामुळे श्रीमंत माणसे, मोठे बंगले, महागडे कपडेलत्ते आणि दागदागिने हे सर्व दाखवणे सोप्पे जाते. तसेच नवरात्र, करवा चौथ यांसारखे सण आणि त्यांच्यासोबत येणारे गरबा, भांगडा यासारखे नृत्यप्रकार यांच्यामुळे कथानक रंगवून ठेवायला मदत होते. तसेच लग्नसोहळे, त्यातील चालीरीती आणि परंपरा यांचाही मालिकांना फायदा होतो. त्यामुळे साहजिकपणे या कुटुंबांना प्राधान्य दिले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2014 रोजी प्रकाशित
मराठी कुटुंबं रंगलीत हिंदी मालिकांत
हिंदी मालिका म्हटल्या की डोळ्यासमोर शहा, मेहता, ठाकूर, चौहान या नावाची गुजराती, मारवाडी, सिंधी किंवा पंजाबी कुटुंबे पाहायला मिळतात.
First published on: 10-08-2014 at 06:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi families in hindi tv serials