२०२० या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर फिल्मी ‘धुरळा’ उडाला. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असून प्रत्येक कलाकाराने उत्तमरित्या अभिनय केला आहे. त्यामुळेच हा मल्टिस्टारर चित्रपट कमी कालावधीत लोकप्रिय झाला. या चित्रपटाची चर्चा केवळ देशातच नाही तर विदेशातही होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ‘धुरळा’ लवकरच कतारमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

देशातील प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर ‘धुरळा’ आता कतारमधील प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. इतकंच नाही तर सईच्या अभिनयाची चर्चा आतापासूनच कतारमध्ये सुरु असल्याचं सांगितलं जातं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सईचा फॅनफॉलोअर्स कमालीचा असून ती मराठी कलाविश्वातील एकमेव अभिनेत्री आहे जिचा ग्लोबली फॅनफॉलोविंग आहे. त्यामुळेच धुरळा कतारमध्ये प्रदर्शित होत असताना सई तेथे उपस्थित असावी अशी तेथील सिनेरसिकांची मागणी आहे. चाहत्यांच्या या विनंतीचा मान ठेवून सईदेखील कताराला जाणार आहे.


“ प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, त्याचे काम जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे. महाराष्ट्रातल्या रसिकांची दाद मिळवल्यावर आता इतर देशांमधल्या प्रेक्षकांपर्यंतही आमचा चित्रपट पोहचणार आहे. आम्हा प्रत्येक कलाकाराला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापैकी कतारच्या प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायची जबाबदारी माझ्यावर आहे. याचा खूप आनंद होतोय. आता कतारच्या माझ्या चाहत्यांना धुरळाच्या निमित्ताने भेटण्याची संधी मिळतेय. त्यांच्यापर्यंत सिनेमा पोहोचवण्याची आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता वाढलीय,” असं सई म्हणाली.

दरम्यान, ‘धुरळा’ या चित्रपटात गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’  सगळेच पैलू या चित्रपटातून उलगडण्यात आले आहेत.