लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या उद्देशाने आतापर्यंत अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्येच आता लवकरच मसुटा हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. समाजाला आरसा दाखवणारा आणि भावनिक नात्याची गोष्ट सांगणारा ‘मसुटा’ या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून अनेकांना चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

आपला देश हा विविधतेने नटलेला तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा असला तरीही काही खेड्यापाड्यात अनिष्ट रूढी, प्रथा आणि जातीभेद हा आज सुद्धा पाळला जातो. यावरच आधारित तसेच शिक्षणासाठी झटणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट ‘मसुटा’ आपल्या समोर आणत आहे. आपल्या समाजात मृत्यूनंतर अंत्यविधी करणं हे फारच महत्त्वाचं समजलं जातं असलं तरी ते अंत्यविधी करणारा समाज मात्र अनेकांना गरजेचा वाटत नाही. गावाखेड्यांमधील शाळा आजही असे काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना तेथे शिक्षण घेऊ देत नाही. या कुटुंबातील मुलींसोबत कोणीही गावातील व्यक्ती लग्न करत नाही. आजही ही कुटुंबे कोणत्याही सरकारी लाभ, योजना व सुविधांसाठी अपात्र मानली जातात. परिस्थिती आणि गाव त्यांच्या विरोधात जाऊन आपल्या मुलाला शिकवण्याची इच्छा असलेल्या बापाची आणि त्याच्या कुटुंबाच्या व्यथेची गोष्ट ‘मसुटा’ मधून आपल्या समोर येणार आहे.

दरम्यान,’मसुटा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित देवळे यांनी केलं असून नागेश भोसले, हृदयनाथ राणे, अनंत जोग, अर्चना महादेव, रियाज मुलानी, कांचन पगारे, वैशाली केंडळे, यश मोरे हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे.