मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे लवकरच एकत्र झळकणार आहेत. आगामी ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटामध्ये मृण्मयी आणि सिद्धार्थ मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहेत. समीर जोशी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून त्याची कथा नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ, मृण्मयीव्यतिरिक्त राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर ही दिग्गज कलाकारमंडळीही स्क्रीन शेअर करणार आहेत.
“मिस यू मिस्टर’चे लेखक आणि दिग्दर्शक समीर जोशी यांच्याबरोबरचा हा माझा दूसरा चित्रपट असून या आधी मी त्याच्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ या चित्रपटामध्ये काम केले होते. ‘मिस यू मिस्टर’मध्ये मी ‘कावेरी’ नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या चित्रपटामध्ये या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे”, असं मृण्मयीने सांगितलं.
“मृण्मयी आणि मी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमध्ये काम केले आहे. मृण्मयी देशपांडे ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळे मलादेखील चित्रपटामध्ये तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण’ नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे”, असं सिद्धार्थने सांगितलं.
दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थ्री आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. “मिस यू मिस्टर” या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले.
समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.