आतापर्यंत आपण जिवलग मित्रासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या मित्रांना चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू आहेत. मैत्रीचे पैलू उलगडून दाखवताना त्याचे वेगळे रूप दर्शवणारा ‘ओढ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली एण्टरटेनमेन्ट हाऊसची प्रस्तुती तसेच एस.आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’चे दिग्दर्शन नागेश दरक आणि एस.आर. तोवर यांनी केले आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.
गणेश आणि दिव्या यांच्यातील निखळ मैत्रीची कथा ‘ओढ’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या दोघांच्या मैत्रीचं भावविश्व त्यातली त्यांची ओढाताण दाखवताना एका घटनेनंतर गणेश व दिव्याची मैत्री कोणतं वळण घेते? याची रंजक कथा म्हणजे ‘ओढ’ हा चित्रपट. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी या कलाकारांसोबत गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी उल्का ‘ओढ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांकडे वळली आहे.
संजाली रोडे, कौतुक शिरोडकर, अभय इनामदार, कुकू प्रभास यांनी यातील चार वेगवेगळ्या जॅानरची गाणी लिहिली आहेत. आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ही गाणी गायली आहेत. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे. या चित्रपटाचे छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केले आहे. वेशभूषा सुनिता घोरावत तर रंगभूषा प्रदीप दादा, बंधु धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत.