scorecardresearch

Premium

‘‘एकच’ प्याला?’ आहे रेखीव, तरीही..

अत्र्यांच्या या विडंबननाटय़ाला पाश्र्वभूमी होती ती मात्र तत्कालिन कॉंग्रेस सरकारने केलेल्या दारूबंदीची!

marathi natak ekach pyala
नाटककार राम गणेश गडकऱ्यांचं ‘एकच प्याला’ हे दारूडय़ांच्या अवनतीचं आणि त्यापायी उद्ध्वस्त होणाऱ्या त्यांच्या संसाराचं दारुण चित्रण करणारं नाटक.

नाटककार राम गणेश गडकऱ्यांचं ‘एकच प्याला’ हे दारूडय़ांच्या अवनतीचं आणि त्यापायी उद्ध्वस्त होणाऱ्या त्यांच्या संसाराचं दारुण चित्रण करणारं नाटक. गडकऱ्यांच्या भाषाप्रभुत्वाचा आणि नाटय़प्रतिभेचा कळसाध्याय म्हणावा असं हे नाटक. बालगंधर्वासारख्या तालेवार कलावंताने यातल्या सिंधूच्या भूमिकेचं आव्हान त्याकाळी स्वीकारलं होतं. गेल्या शतकभराच्या ‘एकच प्याला’च्या वाटचालीत असंख्य नाटय़संस्थांनी त्याचे अक्षरश: हजारो प्रयोग केले.. आजही काही संस्था त्याचे प्रयोग करत असतात. अनेक नटवर्य या नाटकानं जन्माला घातले.. नावारूपास आणले. मराठी संगीत रंगभूमीवरील अग्रमानांकित नाटकांमध्ये ‘एकच प्याला’ची आवर्जून गणना होते. आपल्या या नाटकाचं उत्तुंग यश पाहायला गडकरीमास्तर मात्र हयात नव्हते. वयाच्या अवघ्या पस्तिशीतच त्यांना मृत्यूने गाठलं. गडकऱ्यांना गुरू मानणाऱ्या आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘एकच प्याला’वर आधारित ‘‘एकच’ प्याला?’ हे विडंबनपर नाटक लिहिलं आणि तेही चांगलंच चर्चिलं गेलं. अत्र्यांच्या या विडंबननाटय़ाला पाश्र्वभूमी होती ती मात्र तत्कालिन कॉंग्रेस सरकारने केलेल्या दारूबंदीची!

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच; परंतु त्यावर घातलेली बंदी ही त्याहून वाईट ठरते. कारण त्यामुळे त्या गोष्टीच्या चोरटय़ा, बेकायदेशीर वाढीलाच खतपाणी मिळते, असं अत्र्यांचं मत होतं. गडकऱ्यांचं ‘एकच प्याला’ हे नाटक ‘दारू पिणं वाईट नसून, तिच्या आहारी जाणं वाईट असतं,’ हे दर्शवणारं आहे, असं अत्र्यांचं म्हणणं होतं. म्हणूनच त्यांनी त्याचं विडंबन करून तत्कालिन सामाजिक-राजकीय विसंगतीवर अचूक बोटं ठेवलं. गडकऱ्यांच्या नाटकातली पात्रं अत्र्यांनी आपल्या या विडंबननाटय़ात जशीच्या तशी योजली असली तरी त्यांच्याकरवी दारूचे दुष्परिणाम दाखविण्याऐवजी तिच्या अतिरिक्त आहारी गेल्यामुळेच कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडतं, हे त्यांनी दाखवलं आहे.

devendra fadnavis criticized aditya thackeray
‘वाघनखा’वरून फडणवीस विरुद्ध आदित्य
chagan bhujbal
विकासकामांना स्थगिती प्रकरण: भुजबळ यांच्याकडून याचिका मागे
Chitra Wagh on Uddhav Thackeray
“…तर उद्धव ठाकरे जो बायडन यांच्या बाजूला बसले असते”, चित्रा वाघ असे का म्हणाल्या? वाचा…
Nitesh-Rane-1
नितेश राणे यांच्या दमदाटीच्या विरोधात अधिकारी एकवटले

आचार्य अत्रेलिखित आणि सतीश पुळेकर दिग्दर्शित ‘‘एकच’ प्याला?’ हे विडंबनपर नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. (काही वर्षांपूर्वी हेमंत भालेकर यांनी राज्य नाटय़स्पर्धेत हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्याचा उत्तम प्रयोग सादर झाला होता आणि ते पारितोषिकांनी गौरवलं गेलं होतं. आताच्या नव्या प्रयोगात हेमंत भालेकर यांनी भगीरथाची भूमिका साकारली आहे.) गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’मध्ये नामांकित वकील असलेल्या सुधाकरची आणि त्याच्या कुटुंबाची त्याच्या दारूच्या व्यसनापायी झालेली शोकांतिका दर्शवली आहे. त्यातील तळीराम हे पात्र तर अस्सल दारूडय़ाचं प्रतिनिधित्व करतं. अत्र्यांच्या विडंबननाटय़ात सुधाकर-सिंधू, तळीराम-गीता, रामलाल या पात्रांचा प्रवास मूळ नाटकासारखाच असला तरी तळीराम व रामलालच्या आयुष्याची होणारी शोकांतिका ही त्यांच्या अतिरेकी वर्तनातून झाल्याचा निष्कर्ष अत्र्यांनी काढला आहे. हे नाटक कॉंग्रेस सरकारच्या दारूबंदीच्या अतिरेकी निर्णयावर आणि त्यातल्या विसंगतींवर कोरडे ओढण्यासाठीच अत्र्यांनी मुख्यत: लिहिलं होतं. त्याशिवाय ‘एकच प्याला’संबंधीची त्यांची मतंही त्यातून त्यांनी मांडली आहेत. दारू पिणं वाईट नसून तिच्या सर्वस्वी आहारी जाणं मात्र उचित नाही, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांनी ते हिरीरीनं या नाटकात मांडलं आहे.

सतीश पुळेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा प्रयोग आखीवरेखीव आणि संहितेला धरून असला तरीही त्यात काहीतरी हरवलं आहे असं राहून राहून वाटतं. ‘एकच प्याला’च्या काळातील ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ जमान्याचं चित्रण करत असताना विडंबनासाठी पात्रांना दिलेली ‘ट्रीटमेंट’ जरा ज्यादा(च) झालीय की काय असं वाटतं. उदा. रामलालच्या तोंडच्या वाक्याच्या शेवटचे शब्द घशात अडकल्यासारखे अनुच्चारित राहणं आणि नंतर त्यानं ते पुन्हा उच्चारणं. तसंच सिंधूनं बोलण्याचा शेवट ‘बरं!’ या उद्गारवाचक नोटवर करणं. सुरुवाती-सुरुवातीला या प्रकारात गंमत वाटली तरी नंतर त्यातलं कृतकपण जाणवून ते ओढूनताणून उच्चारल्यासारखे वाटतात. पात्रांची लकब म्हणून त्यांचं उपयोजन केलेलं असलं तरी ते अपेक्षित हशे मात्र निर्माण करीत नाही. सुधाकर आणि रामलालची दारू पिण्यावरून होणारी औपहासिक चकमक आणि त्यात सिंधूनं लाडिकपणे घेतलेली नवऱ्याची बाजू गमतीदार वाटते खरी; पण त्यातून अपेक्षित हसू मात्र येत नाही. एकीकडे दारूबंदीचे कडक र्निबध आणि दुसरीकडे दारू पिण्यासाठी लोकांना परमिट देण्याची पळवाट ठेवणाऱ्या सरकारची खिल्ली या नाटकाद्वारे अत्र्यांनी उडवली आहे. खरं पाहता हाच धागा हायवेच्या आसपासची दारूदुकाने बंद करण्याच्या आजच्या सरकारच्या निर्णयाशी दिग्दर्शकाला जोडता आला असता. या सरकारी निर्णयातून दारूविक्रेत्यांसाठी पळवाट काढण्यासाठी आता हायवे केन्द्राच्या अखत्यारीऐवजी राज्याच्या अखत्यारित असल्याचे दाखविण्याचे घाटते आहे. हा योगायोगही दिग्दर्शकाने नाटकात आणला असता तर हे नाटक वर्तमानालाही तितकंच चपखल लागू पडलं असतं.

या प्रयोगात सर्वात बाजी मारली आहे ती तळीरामाने. त्याने दारू आणि दारूबाजांचं जे काय समर्थन केलं आहे ते अत्यंत भन्नाट आहे. तळीराम साकारणाऱ्या विनायक भावे यांनी ही भूमिका लाजवाब केली आहे. सुशांत शेलार यांनी वकील सुधाकरचं ‘एकच’ प्यालाचं तत्त्वज्ञान मांडताना तळीरामच्या दारू पिण्याचं समर्थनच केलं आहे. फक्त त्याने अतिरेक करता नये होता, अन्यथा त्याची ही अवनती झाली नसती आणि त्याच्या हातून गीता व रामलालचे खून पडले नसते, असं त्याचं म्हणणं. शेलार यांनी गुलछबू स्वरूपात सुधाकर साकारला आहे. पल्लवी वैद्य यांची सिंधू अर्कचित्रात्मक शैलीत आहे. त्यांच्या अवघ्या देहबोलीतून सिंधूचं पातिव्रत्य व दारूबद्दलची ‘चलता है’ वृत्ती प्रतीत होते. रामलाल या दांभिक व संधिसाधू गांधीवादी कार्यकर्त्यांच्या रूपात स्वप्नील राजशेखर यांनी वरवरचा साधेपणा व चापलुसीच्या संमिश्रणातून हे पात्र वास्तवदर्शी केलं आहे. हेमंत भालेकर यांचा सानुनासिक बोलणारा प्रेमवीर भगीरथ लक्षवेधी आहे. गीताचा तिखट झटका मृणालिनी जावळेंनी ठसक्यात व्यक्त केला आहे. अमोल बावडेकर यांनी सूत्रधार आणि गाण्याची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे. त्यांना नटीची (आणि शरदचीही!) भूमिका करणाऱ्या सायली सांभारे यांनी तोलामोलाची साथ केली आहे. मकरंद पाध्ये आणि पुरुषोत्तम हिर्लेकर यांनी परिपाश्र्वकाच्या भूमिका लक्षणीय केल्या आहेत. धैर्य गोळवलकर (शास्त्रीबुवा), मंगेश शेटे (रावसाहेब) आणि अजित नाईक (खुदाबक्ष) यांनीही तळीरामाच्या आर्य मदिरा  हातभट्टी मंडळाचे सच्चे मेंबर सचोटीने साकारले आहेत.

प्रदीप मुळये यांनी सूचक नेपथ्यातून विविध नाटय़स्थळे उभी केली आहेत. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून नाटकातील मूड्स गहिरे केले आहेत. यातल्या गाण्यांना ज्ञानेश पेंढारकर यांनी दिलेल्या चाली श्रवणीय आणि आशयपूरक आहेत. नंदलाल रेळे यांनी पाश्र्वसंगीतातून नाटकाची पिंडप्रकृती अधोरेखित केली आहे. महेश शेरला (वेशभूषा), प्रदीप दर्णे व संदीप नगरकर (रंगभूषा) यांनी नाटकातील काळाचे संदर्भ जिवंत केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi natak ekach pyala review by ravindra parthe

First published on: 09-07-2017 at 02:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×