नाटककार अभिराम भडकमकर यांचं ‘याच दिवशी याच वेळी’ हे २००३ साली रंगभूमीवर आलेलं नाटक. तोवर टीव्हीचा छोटा पडदा घराघरांतील अवकाश व्यापून दशांगुळं उरला होता. ‘इडियट बॉक्स’च्या गारुडानं सर्वसामान्यांच्या मनाचाच नाही, तर मेंदूचाही कब्जा घेतला होता. दूरचित्रवाहिन्यांचं अंतराळात घनघोर युद्ध पेटलं होतं. आणि युद्धात सगळंच माफ असल्याने प्रेक्षक खेचण्यासाठी वाट्टेल ते करण्याची वाहिन्यांची मजल गेली होती. दर्शकांच्या मेंदूचा ताबा घेतलेल्या टीव्हीने त्यांच्या भावभावना आणि विचार करण्याच्या प्रक्रियेवरसुद्धा आक्रमण केलं होतं. वशीकरणानं त्यांना पुरतं निष्क्रिय व व्यसनाधीन केलेलं होतं. वास्तव आणि टीव्हीतलं जग यांच्यातला फरकही विसरला गेला होता. परिणामी टीव्हीच्या पडद्यावरची माणसं जशी वागता/बोलतात, विचार अन् कृती करतात, तसंच प्रत्यक्षातली माणसंही वागू-बोलू लागली. त्यांच्याच डोक्यानं विचार करू लागली. आपलं प्रत्यक्षातलं जग नजरेआड करून मालिकांमधल्या पात्रांचं भावविश्व, त्यांच्या समस्या या जणू आपल्याच आहेत असं मानून त्यांच्या असल्या/नसलेल्या समस्यांनी संत्रस्त होऊ लागली. त्यांच्या जगण्याचं अनुकरण करू लागली. आणि व्हच्र्युअल जगातच वावरू लागली. इंटरनेटनं तर त्यांना आणखीनच खोल आभासी विश्वात ढकललं. याचे भीषण सामाजिक परिणाम माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यात तसंच कुटुंबजीवनात दिसून न येते तरच नवल. पर्यायाने समाजजीवनच उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपली. विवेकी जनांनी कानीकपाळी ओरडून ‘हे योग्य नाही..’ हे सांगूनही त्यांच्यात ढिम्म बदल झाला नाही. याचीच किंमत आज आपण मोजतो आहोत. मूल्यांचा ऱ्हास, धोक्यात आलेलं कौटुंबिक/सामाजिक जीवन, संवेदनेला आलेली बधीरता, वाढता चंगळवाद आणि व्यक्तिवादाचा अतिरेक ही त्याचीच परिणती होय. लेखक अभिराम भडकमकरांनी या संवेदनाहीनतेचं, मूल्यऱ्हासाचं अत्यंत भेदक चित्र ‘याच दिवशी याच वेळी’मध्ये उभं केलं आहे. मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी कुमार सोहोनींच्या दिग्दर्शनाखाली नुकतंच या नाटकाचा प्रयोग सादर केला. ‘आशयाला चोख न्याय देणारा प्रयोग’ असं त्याचं वर्णन करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेंद्र-अनघा या मध्यमवयीन, नोकरदार दाम्पत्याचं कुटुंबजीवन मांडत असताना त्यांच्या आयुष्यात उत्पन्न झालेले परिस्थितीजन्य पेच, त्याला सभोवतालचे असलेले संदर्भ, त्यातून अवनतीकडे होणारा त्यांचा प्रवास हा या नाटकाचा गाभा आहे. मोठय़ा कष्टांनी परिस्थितीशी दोन हात करत सुरेंद्रनं उभारलेलं आपलं विश्व, जीवघेण्या स्पर्धेतील त्याचा रात्रंदिन संघर्ष, स्पर्धेत टिकण्यासाठी, आपली व्यक्तिगत स्वप्नं पुरी करण्यासाठी त्यानं मूल्यांशी केलेली तडजोड, त्यावरून त्याच्या मनात चाललेली घालमेल एका बाजूला. तर दुसरीकडे चंगळवादी भोवतालात वाहवत गेलेली त्याची पत्नी अनघा. टीव्हीतल्या माणसांच्या विश्वात गुंगून गेलेली. त्यांचं अंधानुकरण करणारी. तीच गोष्ट तिच्या मैत्रिणीची- विशाखाची. इडियट बॉक्समधून प्रसारित होणारी मूल्यं, बाजारपेठीय विक्रीतंत्राची तीही बळी झालीय. त्यातून निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना तिला सतत पोखरते आहे. इकडे सुरेंद्र-अनघाचा मुलगा मानस पौगंडावस्थेतील बदलांशी झुंजतो आहे. त्याला कुणी नीट समजून घेत नाही. त्यामुळे त्यानं बंड पुकारलेलं. तशात तो प्रियाच्या अनावर आकर्षणात ओढला जातो. ती अत्याधुनिक विचारांची मुलगी आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ हे तिच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान. एकमेकांशी संवाद हरवलेल्या, ‘स्व’शीच देणंघेणं असलेल्या या कुटुंबाचं हे चित्र प्रातिनिधिकच म्हणायला हवं. जागतिकीकरणाने ज्या असंख्य उलथापालथी केल्या, त्याचंच हे प्रत्यक्षरूप. लेखकानं तितक्याच नृशंसपणे, क्रौर्यानं ते नाटकात चित्रित केलं आहे. यातली पात्रं आपल्या आजूबाजूचीच नाहीत, तर ती आपणच आहोत, ही जाणीव किंचितशी संवेदना असलेल्यांनाही नक्कीच होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi play yach divashi yach veli by abhiram bhadkamkar review by ravindra pathare
First published on: 26-03-2017 at 00:48 IST