scorecardresearch

Pradeep Patwardhan Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Marathi Actor Pradeep Patwardhan Death : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे.

Pradeep Patwardhan Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन

Marathi Actor Pradeep Patwardhan Died : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती, असे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले.

मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.

‘मोरूची मावशी’ या नाटकाचे त्यांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले होते. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातील प्रदीप पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यासोबतच ‘होल्डिंग बॅक’ (२०१५), ‘मेनका उर्वशी’ (२०१९), ‘थँक यू विठ्ठला’ (२००७), ‘1234’ (२०१६) आणि ‘पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’ (२०१६) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.

नव्वदच्या दशकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्याबरोबर एकत्रित अनेक मराठी चित्रपटातून काम केले होते. अभिनेता – दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या चित्रपटातूनही प्रदीप पटवर्धन यांनी काम केले होते.

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार याबाबत हळहळ व्यक्त करत आहेत. मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. “प्रदीप पटवर्धन, भावपूर्ण श्रद्धांजली”, असे ट्वीट रेणुका शहाणे यांनी केले आहे.

त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. “मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi veteran actor pradeep patwardhan passes away due to heart attack nrp