एक सुरेख नृत्यांगना आणि मनमिळाऊ अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री अमृता खानविलकर पुस्तकांची चाहतीसुद्धा आहे. माझा किताबखाना या सदराच्या निमित्ताने अमृताने वाचलेल्या काही पुस्तकांना तिने उजाळा दिला. यावेळी तिला अनेक पुस्तकांची आठवणही झाली. बऱ्याच जणांनी भेट दिलेल्या पुस्तकांनी अमृताचा किताबखाना सजला आहे. पण, या सर्व पुस्तकांच्या गर्दीत परिकथा किंवा मग कल्पना विश्वात रमणाऱ्या, अदभूत गोष्टी वाचण्याकडे तिचा जरा जास्तच कल.
याव्यतिरिक्त सिडनी शेल्डन यांची कोणतीही पुस्तकं तितक्याच आवडीने वाचण्यासाठी ती बरीच उत्सुक असते. कथा रचण्याची त्यांची पद्धत आणि एकंदर त्या कथेची मांडणी आणि त्यांच्या अनोख्या, लेखनशैलीमुळे सिडनी यांच्या लेखनाची अमृता चाहती आहे. वाचनाच्या याच सवयीनुसार सांगताना ती म्हणाली, सिडनी शेल्डन यांचं ‘मेमरी ऑफ मिडनाईट’ हे पुस्तकही माझं तसं आवडीचंच. मला सुबोध भावेच ‘घेई छंद’ फार आवडलं. त्यातले अनुभव, प्रसंग आपल्याला ते क्षण जगायला भाग पाडतात. तसं पाहिलं तर माझ्या किताबखान्यात विविध पुस्तकं आहेत. हल्ली हल्ली तर माझ्या पतीच्या म्हणजेच हिंमांशूच्या सांगण्यावरुन मी अध्यात्मिक पुस्तकंही वाचते. अध्यात्मिक पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळते.’
वाचा : अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी
कादंबरी वाचण्याकडे फारसा कल नसलेल्या अमृताने अमिश त्रिपाठीच्या शिवा ट्रायॉलॉजीचाही विशेष उल्लेख केला. त्याच्या या पुस्ताकांमध्ये त्याने ज्या पद्धतीने शिवाची प्रतिमा उभी केली आहे ही खरंच सुरेख बाब आहे. त्यातही या पुस्तकांकडे असणारा तरुणाईचा कल पाहता अमृता म्हणाली, ‘अमिशने मांडलेला दृष्टीकोन वाचकांना भावतोय. त्याने पुस्तकात मांडल्याप्रमाणे शिवा हा सर्वसामान्यच होता. पण ही बाब काहीजणांसाठी धक्कादायक असू शकते. तिच बाब अमिशने त्याच्या शब्दांतून प्रत्ययकारीपणे सर्वांपर्यंत पोहोचवली आहे.’ या सर्व पुस्तकांच्या गोतावळ्यात मला वाचनातून पुलं भेटले नाहीत, असंही अमृता म्हणाली. मला वाचनातून पुलं भेटले नाहीत याउलट माझे बाबा ऐकत असलेल्या टेपरेकॉर्डरच्या आवाजातून पुलं भेटले. त्यांच्या लेखणीपेक्षा आवाजाच्या माध्यमातून भेटलेले पुलं मला जास्त भावले, असं म्हणत एका वेगळ्या पुलंची भेट झाल्याचंही अमृताने सांगितलं. पुस्तकं आणि अमृताचं नातं पाहिलं तर त्यात बरीच विविधता आढळते. पण, एक नृत्यांगना म्हणून अद्यापही या अभिनेत्रीच्या वाचनात नृत्याविषयीचं पुस्तक आलं नाहीये. असं असलं तरीही नृत्यावर आधारित एखादं पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल, असंही अमृताने स्पष्ट केलं. हा होता अमृता खानविलकरचा कलात्मक किताबखाना. यापुढील किताबखान्यात कोणत्या कलाकाराच्या आवडत्या पुस्तकाबद्दल माहिती मिळणार हे जाणून घेण्यासाठी वाचा ‘माझा किताबखाना’.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com