‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावेळी या वादग्रस्त घरामध्ये शिक्षकापासून ते अगदी गुगलमध्ये काम करणारे काही सर्वसामान्य चेहरेसुद्धा दिसणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पर्वामध्ये फक्त आणि फक्त सेलिब्रिटींमुळेच चर्चेत येणाऱ्या ‘बिग बॉसच्या घरामध्ये लुधियानाचा एक व्यावसायिकही प्रवेशाच्या तयारीत आहे. ३० वर्षांचा हा रांगडा देव देवगण म्हणजेच देविंदर सिंग देवगण सध्या त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आहे. जोरजोरात बोलण्याची सवय असणाऱ्या देवला भांगडा हा नृत्यप्रकार फार आवडतो. त्याने पंजाब विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठीच्या शर्यतीत उतरलेल्या तेरा सर्वसामान्य चेहऱ्यांपैकी देव एक स्पर्धक आहे.

पण, इतक्यातच देवच्या पुढचे आव्हान संपणार नाही आहे. यापुढे प्रेक्षकांवर आपली छाप पाडत त्यांची मनं जिंकण्याची मोठी जबाबदारीसुद्धा लुधियानाच्या या व्यावसायिकावर असणार आहे. मुळचा पंजाबी असल्यामुळे इतर १२ स्पर्धकांना देव चांगलीच टक्कर देणारा ठरु शकतो. त्यामुळे या वादग्रस्त घरामध्ये प्रवेश मिळवण्यात हा ‘पंजाब दा पुत्तर’ यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण, इतरांवर नेहमीच वर्चस्व दाखवण्याचा देवचा स्वभाव त्याला त्रासदायक ठरु शकतो हेही तितकेच खरे आहे. कारण ‘जशास तसे’ अशाच काहीशा नियमावलीवर बिग बॉसच्या घरातील सूत्र चालत असतात. या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे स्वरुप पाहता वादविवाद आणि त्यापासून मिळणारी लोकप्रियता यांच्या बळावर नेहमीच टीआरपीच्या बाबतीत बिग बॉस अग्रस्थानी असतो.

हे बिग बॉसचे १० वे पर्व असल्यामुळे सध्या टेलिव्हीजन विश्वात त्याचीच चर्चा रंगत आहे. अभिनेता सलमान खान यावेळीही त्याच्या हटके शैलीमध्ये या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. १६ ऑक्टोबरला या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाला सुरुवात होणार असून अभिनेत्री दीपिका पदुकोण बिग बॉसच्या मंचावर येणार असल्याची चर्चा आहे.