बॉलिवूडमधील किंग ऑफ कॉमेडी या नावाने सर्वपरिचित असलेला अभिनेता म्हणजे मेहमूद. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करुन पुढे आलेल्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. खरं तर मेहमूद यांचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, चित्रपट आणि त्यांची विनोदशैली यामुळे आजही ते प्रेक्षकांच्या मनात आहेत. ज्या किशोर कुमारांनी प्रथम मेहमूद यांना काम देण्यास नकार दिला होता, त्याच किशोर कुमारांना मेहमूद यांनी नंतर स्वत:च्या निर्मिती संस्थेने तयार केलेल्या चित्रपटात काम दिले. ‘भूत बंगला’, ‘पडोसन’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘गुमनाम’, ‘कुवारा बाप’ हे चित्रपट महमूद यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे गाजले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकिजमध्ये काम करायचे. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मेहमूद घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रोज मालाड ते विरार दरम्यान लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकायचे. मेहमूद यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. वडिलांच्या ओळखीमुळे त्यांना १९४३ मध्ये बॉम्बे टॉकिजच्या ‘किस्मत’ मधून नशीब आजमवण्याची संधी मिळाली. या चित्रपटात मेहमूद यांनी अशोक कुमार यांच्या बालपणातील भूमिका साकारली होती.

मेहमूद यांच्या बोलण्यातील हैदराबादी लहेजा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मेहमूद यांची संवादफेक आणि त्यांचा अभिनय लोकांना आवडला. ज्यावेळी मेहमूद यांना अभिनयाला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली, त्यावेळी भारतीय चित्रपट सृष्टीवर किशोर कुमार यांच्या विनोदाची जादू होती. लेखक मनमोहन मेलविले यांनी त्याच्या एका लेखात मेहमूद आणि किशोर कुमार यांचा एक किस्सा नमूद केला आहे. किशोर कुमार यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरू असताना मेहमूद यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटात काम देण्याची विनंती केली होती. मात्र मेहमूद यांच्या अभिनयाचा आवाका जाणून असणाऱ्या किशोर कुमार यांनी मेहमूद यांना संधी दिली नाही. भविष्यात जी व्यक्ती आपल्यासाठी आव्हान ठरु शकते, त्या व्यक्तीला संधी कशी देणार, असा विचार किशोर कुमार यांनी केला.

किशोक कुमार यांच्याकडून मिळालेला नकार मेहमूद यांनी स्वीकारला. एक दिवस मी मोठा चित्रपट निर्माता होईन आणि तुम्हाला माझ्या चित्रपटात काम देईन, असे त्यावेळी मेहमूद यांनी म्हटलं होतं आणि अखेर मेहमूद यांनी त्यांचे शब्द खरे करुन दाखवले. पुढे त्यांनी स्वत:च्या निर्मिती संस्थेच्या ‘पडोसन’ या चित्रपटात किशोर यांना संधी दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehmood birthday special kishor kumar and mehmood anecdote actor bollywood ssj
First published on: 29-09-2020 at 08:27 IST