हॉलिवूड अभिनेता मेल गिब्सनच्या घरी पुन्हा एका पाळणा हलला आहे. तो नवव्यांदा बाबा बनला आहे. पिपुल डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मेल गिब्सन (६०) याची प्रेमिका रोजालिंड रॉस (२६) हिने त्याच्या मुलाला शनिवारी जन्म दिला. गिब्सच्या प्रतिनिधीने सांगितले की, मुलाचे नाव जॉर्न लार्स गेरॉर्ड असे ठेवले आहे.
तसेच त्याचा प्रतिनिधी म्हणाला की, मेल गिब्सन आणि रोजालिंड रॉस दोघंही फार खूश आहेत. लार्सही खूप सुंदर आहे. मेलचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत आहे. स्वतः मेलचा आनंद गगनात मावत नाही. गिब्सनला त्याच्या आधीच्या पत्नीपासून सात मुलं आहेत. शिवाय रुसमधील एका पियानो प्लेयर ओकसानासोबतही त्याचे संबंध होते. तिच्यापासूनही त्याला एक मुलगी आहे.
अगं बाई अरेच्चा या मराठी सिनेमाची मुळ कथा ही हॉलिवूडपट व्हॉट वूमन वॉन्ट या सिनेमाची होती. या सिनेमात मेल गिब्सनची मुख्य भूमिका होती. ८० आणि ९० च्या दशकात मेल गिब्सन हे एक नावाजलेले नाव होते. पॅशनऑफ दी ख्राईस्ट हा िनेमाही त्याचा प्रचंड गाजला होता. एक अभिनेता म्हणून त्याचे हॉलिवूडमधे नाणे खणखणीत वाजले असले तरी तो दिग्दर्शक म्हणूनही तेवढाच प्रसिद्ध आहे.
एक सभ्य अभिनेता अशीच त्याची ओळख होती. पण काही कारणांमुळे त्याचे खासगी आयुष्य प्रसारमाध्यमांच्या समोर आल्यानंतर मात्र त्याच्या प्रतिमेला तडा जायला सुरुवात झाली होती. त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबतचे त्याचे वाद सर्वांसमोर आले होते. तसेच ज्यू लोकांबद्दल त्याने वंशवादी उद्गार काढले होते. त्यामुळे त्याच्यावर भरपूर टिकाही करण्यात आली होती.