फिल्म्स डिव्हिजन, चित्रपट महोत्सव संचालनालय, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व चिल्ड्रन्स फिल्म्स सोसायटी हे चारही विभाग राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) विलीन केले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
विलीनीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष सल्लागार तसेच विधि सल्लागारही नेमला जाईल. त्याद्वारे चारही विभागांच्या मालमत्ता व संपदांचे ‘एनएफडीसी’मध्ये हस्तांतरण केले जाणार असून सर्व कर्मचाऱ्यांनाही सामावून घेतले जाणार आहे. विलीनीकरणात कर्मचाऱ्यांचे हितसंबंध जपले जाणार असून कर्मचारी कपात होणार नसल्याचे सरकारी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या चारही संस्था ‘एनएफडीसी’ अंतर्गत कार्यरत राहतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाच्या चित्रपटांची निर्मिती व्हावी व ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने पाच संस्थांचे विलीनीकरण केले जाणार आहे. या विभागांकडून होणारी ही कामांची पुनरावृत्ती विलीनीकरणामुळे टाळली जाऊ शकेल. तसेच, अधिक समन्वयाने व प्रभावीपणे हे विभाग काम करू शकतील, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.