सध्या देशभरात #MeToo मोहिमेचं वादळ आलं असून अनेक मोठी नावं समोर येत आहेत. याची सुरुवात केली ती अभिनेत्री तनुश्री दत्ताने. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेकांनी पुढे येऊन आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री दत्तानंतर बॉलिवूडमधील अनेक महिला सेलिब्रेटी पुढे आल्या असून आपले अनुभव शेअर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याचंही नाव यामध्ये आलं असून क्रू मेम्बरने आपल्याशी लैंगिक गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री कंगना रणौतनेही विकास बहलसोबत आलेले भयानक अनुभव शेअर केले आहेत. विकास बहल फँटम फिल्म्सचा सह-संस्थापक होता. हे प्रोडक्शन हाऊस बंद करण्यात आलं आहे. या आरोपांमुळे विकास बहलला सुपर 30 चित्रपटातून माघार घ्यावी लागली आहे.

विकास बहलबद्दल विचारलं असता कंगनाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘विकास बहलसोबत जे काही होत आहे ते अगदी योग्य आहे. आपल्या इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत ज्यांना महिलांशी कसं वागायचं कळत नाही. ते त्यांचा छळ करतात. त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे’.

पुढे बोलताना तिने सांगितलं की, ‘जे लोक आपल्या पत्नीला घेऊन मिरवतात आणि प्रेयसीला लपवून ठेवतात त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे’. हा टोला हृतिकसाठी होता का असं विचारलं असता, हो मी हृतिकबद्दलच बोलत असल्याचं तिने सांगितलं. ‘मी हृतिकबद्दलच बोलत आहे. लोकांनी त्याच्यासोबत काम करणं बंद केलं पाहिजे’, असं कंगनाने म्हटलं आहे.

हृतिक आणि कंगनामधील वाद बॉलिवूड आणि प्रसारमाध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता. ‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटं बोलत असल्याचं सांगत दावा फेटाळला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metoo noone should work with hrithik roshan says kangana ranaut
First published on: 11-10-2018 at 13:26 IST