गेले काही महिने स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात सुरू असलेल्या ‘# मी टू’ या मोहिमेने संपूर्ण समाजमाध्यम क्षेत्र दणाणून सोडले. ज्या महिला वर्षांनुवर्षे पुरुषी अत्याचाराला बळी पडत होत्या, परंतु केवळ मनात खोलवर रुजलेल्या भीतीपोटी त्या कोणासमोर व्यक्त होत नव्हत्या. त्यांनीही ‘# मी टू’ या मोहिमेअंतर्गत अन्यायाविरोधात जोरदार आवाज उठवला. पुढे हीच लाट तिहेरी तलाकसारख्या अमानुष रूढी, परंपरांविरोधातही रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. परिणामी समाजमाध्यमे व वृत्तमाध्यमांमधून ‘# मी टू’वर कौतुकाचा वर्षांव झाला; परंतु ही लाट खऱ्या अर्थाने जिथे निर्माण झाली त्या हॉलीवूड चित्रनगरीतील चित्रपट निर्माता मायकेल हॅनेके यांनी मात्र या मोहिमेचा विरोध केला आहे. हॅनेके हे सिनेसृष्टीतील एक बडे प्रस्थ असल्यामुळे त्यांनी विरोध करताच त्यांच्याशी सहमत असलेल्या कॅथरीन डेनोव्ह, ऑलिव्हर स्टोन, लिंडा लोहान, डॉन कॅरन यांसारख्या अनेकांनी समाजमाध्यमांतून आपला आवाज वाढवत या मोहिमेला जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. अनेक स्वयंसेवी संस्था व नेटकऱ्यांनी त्यांच्या या ट्विटरबाजीचा कडाडून विरोध करत त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची धमकी दिली.

परंतु मायकेल हॅनेके हे आपल्या विचारांवर ठाम असून त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या विरोधाची कारणे स्पष्ट केली आहेत. त्यांच्या मते समाजातील अत्याचारपीडित महिलांना जागृत करण्याच्या उद्देशाने पाहिले तर ही मोहीम योग्य आहे, परंतु अनेकांनी केवळ प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी या मोहिमेचा गैरवापर केला आहे. त्यांच्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांकडे संशयाने पाहण्याचे एक नवे सत्र रूढ होत आहे. हॉलीवूड चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी आलेल्या सर्व अभिनेत्री सुशिक्षित, बुद्धिमान व सामाजिकदृष्टय़ा जागृत असतात आणि अशा सामाजिकदृष्टय़ा पुढारलेल्या महिला अत्याचाराला बळी पडतात हे मायकेल हॅनेके यांच्या बुद्धीला पटत नाही. तसेच जर कोणी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेचच त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. अमेरिकन पोलीस आपल्या कामात इतके प्रामाणिक आहेत की त्यांच्या तक्रारींची ते गांभीर्याने नोंद घेतील; परंतु अत्याचारांचे दावे करणाऱ्यांपैकी अद्याप कोणी पोलीस तक्रार केल्याचे त्यांना ज्ञात नाही. अनेकांनी केवळ माध्यमांमधून प्रकाशझोतात येण्यासाठी ‘# मी टू’ मोहिमेचा गैरवापर केला आहे, या मतावर हॅनेके ठाम आहेत.