गायक सुखविंदर सिंह रुपेरी पडद्यावर
एखाद्या गाण्यात प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर तो पाश्र्वगायक गाणे सादर करताना दिसणे आणि त्या गाण्याला आवाजही त्या पाश्र्वगायकाचाच असणाऱ्यांच्या यादीत आता गायक सुखविंदर सिंह यांची भर पडली आहे. आगामी ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ या चित्रपटातील त्यांनी गायलेले गाणे त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक राज राठोड हे आहेत. अभिनेते मिलिंद गुणाजी या चित्रपटात ‘शनी’देवाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटासाठी ‘देवा शनि देवा’ हे गाणे सुखविंदर सिंह यांनी गायले असून चित्रपटात हे गाणे त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे सुफी शैलीतील आहे. सुफी शैलीतील या गाण्यामध्ये सुखविंदर सिंह यांनी खास काठेवाडी पोशाख परिधान केला आहे. हे गाणे फारुख बरेलवी यांनी लिहिले असून संगीत फरहान शेख यांचे आहे.
शनी देवाचे माहात्म्य सांगणाऱ्या या चित्रपटात अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी शनिदेवाची भूमिका साकारली असून सुधीर दळवी, मनोज जोशी, वर्षां उसगावकर, पंकज विष्णू आदी कलाकार या चित्रपटात आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.