‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर मायदेशी परतल्यानंतर सध्या सर्वत्र तिच्याबद्दल चर्चा रंगली आहे. भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणारी मानुषी विमातळावर येताच चाहत्यांनी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिची एक झलक टिपण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याच उत्साही माहोलात मानुषीने माध्यमांशी संवाद साधत अनेकांच्याच शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी तिला आगामी वाटचालीबाबत काही प्रश्नही विचारण्यात आले. त्याविषयी सांगताना मानुषीने सध्यातरी आपण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या विचारात नसल्याचे स्पष्ट केले.

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या मानुषीने यावेळी महिलांशी निगडीत काही महत्त्वाच्या प्रश्नावरही चर्चा केली. मासिक पाळीच्या वेळी महिलांनी स्वच्छतेच्या बाबतीत नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयीच्या एका प्रकल्पावर काम करणाऱ्या मानुषीने यावेळी अतिशय विस्तृत पद्धतीने आपले म्हणणे सर्वांसमोर ठेवले. बाह्य शारीरिक सौंदर्यापेक्षा तुम्ही इतर गोष्टींना आणखी सुंदर बनवण्यासाठी कसा आणि किती प्रयत्न करता ही गोष्टच फार महत्त्वाची आहे, असे मानुषी म्हणाली.

मानुषीने मिस वर्ल्ड किताब मिळवल्यापासूनच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का, हा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, ‘सध्या मी जे काम करतेय त्यात मला फारच आनंद मिळतोय. मिस वर्ल्ड स्पर्धेतील इतर सौंदर्यवतींचीही मला यात साथ लाभणार आहे. त्यामुळे मला याच गोष्टीची फार उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे सध्या तरी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा माझा कोणताही विचार नाही, असे मानुषीने सांगितले. मात्र, भविष्यात तशी वेळ आलीच तर मला आमिरसोबत काम करायला आवडेल, असे तिने म्हटले. ‘चित्रपटसृष्टीत सर्वच कलाकार प्रतिभावान आहेत. पण, मला आमिर खानसोबत काम करायला फारच आवडेल. कारण तो नेहमीच आव्हानात्मक भूमिकांना न्याय देतो. त्याच्या चित्रपटांतून समाजाच्यादृष्टीने काही महत्त्वाचे संदेश देण्यात येतात. पण, त्याशिवाय सर्वसामान्यही त्याच्या चित्रपटाशी सहजपणे जोडले जातात’, असेही तिने सांगितले.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’