एखाद्या सिनेमात कुख्यात गुंडाच्या प्रेमात अभिनेत्री आकंठ बुडाली आहे हे पाहणे काही नवीन नाही. पण खऱ्या आयुष्यात एखादी अभिनेत्री कुख्यात गुंडाच्या प्रेमात पडली तर तिच्या आयुष्याची कथा ही कोणत्याही सिनेमापेक्षा अधिक रंजक होईल यात काही शंका नाही. वयाच्या २० व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मोनिका बेदीच्या आयुष्यातील कथाही काहीशी अशीच आहे. १८ जानेवारी १९४५ ला पंजाबच्या होशियारपुरमध्ये जन्मलेली मोनिका आणि डॉन अबु सालेम यांचे प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय होते. आज मोनिका बेदीचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसा दिवशी जाणून घेऊया ती अबु सालेमला कशी भेटली आणि कशाप्रकारे त्याने तिला सिनेमे मिळवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००८ मध्ये रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने सांगितले की, ‘एक दिवस मला दुबईवरुन फोन आला आणि त्याने सांगितले की तो एक कार्यक्रम आयोजित करत आहे, ज्यात मीही सहभागी व्हावे. त्या माणसाने पुढे सांगितले की, सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्यावर तो मला पुन्हा फोन करेल. काही दिवसांनंतर त्या माणसाने पुन्हा फोन केला आणि थोडा वेळ बोलत होता. काही दिवसांनी परत त्याचा फोन आला. यावेळी आम्ही फार सहजरित्या एकमेकांशी बोलत होतो. त्यावेळी त्याने त्याचे नाव काही तरी वेगळेच सांगितले होते. तेव्हा मला माहित नव्हते की तो अबु सालेम आहे. जरी त्याने आपले नाव अबु सालेम असे सांगितले असते तरी मला काही कळले नसते. कारण तेव्हा मला फक्त दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचीच नावे माहित होती.’ मोनिकाच्या मते, दुबईवरुन फोन करणाऱ्या व्यक्तिला भेटण्याआधीच ती त्याला पसंत करु लागली होती. ती नेहमीच त्याच्या फोनची वाट बघायची.

त्यानंतर मोनिकाचे दुबईला जाणे वाढले. तिच्यात आणि सालेममध्ये कालांतराने जवळीकही वाढली. साधारणतः १९९५ मध्ये मोनिकाने आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. पण सालेमला भेटेपर्यंत तिचा एकही सिनेमा फारसा गाजला नव्हता. असे म्हटले जाते की मोनिकाच्या प्रेमात अडकल्यानंतर सालेमनेच तिला मोठ्या सिनेमात भूमिका देण्यास मदत केली होती. १९९९ मध्ये आलेला सलमान खानचा ‘जानम समझा करो’ या सिनेमात मोनिकाला रोल मिळवून देण्यात सालेमचा फार मोठा हात होता.

अबु सालेमचे चरित्र लिहिलेले पत्रकार ए हुसैन जैदी यांच्या मते, २००१ मध्ये आलेला संजय दत्त आणि गोविंदा यांचा ‘जोडी नंबर १’ या सिनेमात सालेमच्या सांगण्यावरुनच मोनिकाला ती भूमिका मिळाली होती. जैदी यांच्या मते, या सिनेमात गोविंदासोबत ट्विंकल खन्नाची जोडी होती. यावेळी बी- ग्रेडची अभिनेत्री मानल्या जाणाऱ्या मोनिकासोबत संजय दत्त काम करण्यास तयार नव्हता. जैदी यांच्या सांगण्यानुसार, संजय तर हा सिनेमा सोडण्यासही तयार होता पण त्याला एक फोन आला आणि संजयने त्याचा निर्णय बदलला. डेविड धवन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

१८ नोव्हेंबर २००२ मध्ये पोर्तुगाल पोलिसांनी सालेम आणि मोनिका यांना पकडले आणि त्यांना भारताकडे सुपूर्द केले. २००६ मध्ये मोनिकाला बनावट पासपोर्ट बनवण्यासाठी दोषी ठरवण्यात आले आणि तिला शिक्षाही सुनावली. मोनिकाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयानेही तिला दोषी ठरवले पण तिची शिक्षा कमी करण्यात आली. मोनिकाला जेवढी शिक्षा सुनावण्यात आली होती तेवढी शिक्षा तिने आधीच पूर्ण केली होती. मोनिकाने सांगितल्यानुसार, तिला अटक केल्यानंतर ती कधीच सालेमला भेटली नाही. २०११ मध्ये एका तामिळ सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पुनरागमन केले. असे असले तरी त्यानंतर ती सिनेमांमध्ये फार कमीच दिसली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monica bedi gangster abu salem love story sanjay dutt
First published on: 18-01-2017 at 14:16 IST